शेतकरी त्रस्त, नेते प्रचारात व्यस्त

By admin | Published: October 6, 2014 01:44 AM2014-10-06T01:44:20+5:302014-10-06T01:44:20+5:30

अकोला जिल्ह्यात तापमानाचा कहर आणि त्यात भारनियमनाचे संकट.

The farmers suffer, the leaders are busy campaigning | शेतकरी त्रस्त, नेते प्रचारात व्यस्त

शेतकरी त्रस्त, नेते प्रचारात व्यस्त

Next

विवेक चांदूरकर / अकोला
परतीच्या पावसाने दिलेली दडी, ४0 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलेले तापमान (ऑक्टोबर हिट), िपकांवर विविध किडींचा हल्ला, त्यातच भारनियमनाचा प्रकोप, यामुळे जिल्ह्यातील पिकांची अवस्था दयनीय झाली असून, कपाशी व सोयाबीन करपले आहे. शेतकरी चोहीकडून संकटात सापडला असतानाच नेते मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग असून, अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
विदर्भात यावर्षी पावसाला दोन महिने विलंब झाल्याने खरीप पिकांची पेरणी दोन-अडीच महिने उशिराने झाली. त्यामुळे पिकांची दयनीय अवस्था असतानाच एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे िपके सुकत आहेत. जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ४५ हजार ८६ हेक्टरवरच पेरणी झाली. सोयाबीनची २ लाख ३३ हजार १३३ हेक्टरवर तर कपाशी १ लाख १४ हजार ७0४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान ३७ ते ४0 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सध्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील संपूर्ण पिके करपणार असून, नुकसानाचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे. पावसाच्या संकटासोबतच पिकांवर विविध किडींनीही आक्रमण केले आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. या संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नेते, उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात मग्न आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: The farmers suffer, the leaders are busy campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.