संप काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच!
By admin | Published: June 7, 2017 01:54 AM2017-06-07T01:54:33+5:302017-06-07T01:54:33+5:30
विदर्भ-मराठवाड्यातील सहा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला/ वर्धा/ बुलडाणा/ नाशिक/ बीड/ उस्मानाबाद : संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्जबारीपणाला कंटाळून विदर्भातील आणि मराठवड्यातील प्रत्येकी शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याच्या घटना घडल्या आहेत.
अकोट (जि. अकोला) तालुक्यातील उमरा येथील गणेश काळबेंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ जून रोजी उघडकीस आली. गणेश काळबेंडे यांच्याकडे अडीच एकर शेती होती. कर्जाचा डोेंगर आणि चालु हंगामासाठी बी-बियाण्याची तजवीज करण्याचा ताळमेळ बसत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. पेरणीसाठी पैशाची सोय तसेच सेवा सहकारी सोसायटीसह बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतच त्यांनी अखेर ६ जून रोजी पत्नी व दोन मुले गावी तर एक मुलगा शेतात गेल्यानंतर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील परतापूर येथे संजय रामराव घनवट (४६) या शेतकऱ्याने सोमवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच होता. त्यातच उपवर मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. या ताणातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी आहे.
वर्धा जिल्ह्याच्या आकोलीमध्ये ईश्वर बळीराम इंगळे (५६) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ईश्वर यांनी शेतीसाठी बँकेतून जवळपास ३ लाखाचे कर्ज घेतले होते. त्यातच खरीपाच्या तोंडावर त्यांच्याकडील एक बैल दगावला. परिणामी, मशागतीची कामे कशी करावी असा प्रश्न त्यांना भेडसावत होता.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कलदेव लिंबाळा येथील गुरुनाथ गुंडू ढोणे (२९) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री कर्जास कंटाळून गळफास घेतला. त्याच्या नावे साडेतीन एकर शेती आहे़ यातील उत्पन्नावर उदरनिर्वाह भागत नसल्याने त्याने कर्ज काढले होते़ हे कर्ज भरण्याची मुदत संपत आल्याने तो हवालदिल झाला होता. शिवाय, पेरण्या तोंडावर आल्याने खत-बियाणासाठी पैश्याची जुळवाजुळव करण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील हिवरवाडीतील सूर्यभान बाबूराव गुंजाळ (५५) या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विंवचनेतून विषप्राशन केले. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी आंदोलनात सक्र ीय सहभाग घेतलेल्या येवला तालुक्यातील पिंपरी येथील नवनाथ चांगदेव भालेराव (३०) या तरु ण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. भालेराव यांच्यावर सुमारे साडेचार लाखांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.