अकोला जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: August 21, 2015 10:38 PM2015-08-21T22:38:08+5:302015-08-21T22:38:08+5:30
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा कारणीभूत.
पाथर्डी (अकोला): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील शेतकरी मंगल वासुदेवराव लुटे (वय ४५) यांनी शुक्रवारी आत्महत्या केली. जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी केली; मात्र नंतर पावसाने जवळपास महिनाभर दडी मारली. त्यामुळे पिके सुकली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. परिणामी पिकांची नासाडी झाली. अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. याच परिस्थितीला तोंड देत पाथर्डी येथील शेतकरी मंगल लुटे हे हतबल झाले होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. त्यांनी शेतीसाठी ८0 हजार रुपये कर्ज काढले; मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये एकूणच परिस्थिती नमुद केली आहे.