पेरणी उलटण्याच्या विवंचनेत दोनवाडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:58 PM2019-07-13T13:58:47+5:302019-07-13T14:00:19+5:30
श्रीहरी तुकाराम झटाले (६०) असे या शेतकºयाचे नाव असून, त्यांनी सकाळी स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
म्हातोडी (अकोला) : आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर व त्यातच पावसाने दडी मारल्याने पेरलेल्या पिकाचे काय होणार, या विवंचनेत असलेल्या अकोला तालुक्यातील दोनवाडा येथील अल्पभूधारक शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. श्रीहरी तुकाराम झटाले (६०) असे या शेतकºयाचे नाव असून, त्यांनी सकाळी स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
दहीहांडा पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या दोनवाडा येथील शेतकरी श्रीहरी झटाले यांच्याकडे तीन एकर शेती आहे. नुकतीच त्यांनी पेरणी केली होती. दरम्यान, पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे काय होईल, याची चिंता त्यांना लागलेली होती. तसेच त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँक व खासगी फायनान्स कंपनीचेही कर्ज असल्याची माहिती आहे. या विवंचनेत असताना श्रीहरी झटाले यांनी शुक्रवारी सकाळी कुटुंबिय घरात नसल्याचे पाहून गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा विजय बाहेरून आल्यानंतर त्याच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच दहिहांडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. श्रीहरी झटाले यांच्या पश्चात एक मुलगा, सुन व नातवंड असा परिवार आहे.