भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने लिंबू फेकले नाल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:27+5:302021-06-10T04:14:27+5:30
ज्ञानेश्वर नागलकर यांनी २०१४ मध्ये पाच एकरांमध्ये लिंबूची लागवड केली होती. चार वर्षांपर्यंत लिंबू लागवड करून मशागत केली. गेल्या ...
ज्ञानेश्वर नागलकर यांनी २०१४ मध्ये पाच एकरांमध्ये लिंबूची लागवड केली होती. चार वर्षांपर्यंत लिंबू लागवड करून मशागत केली. गेल्या तीन वर्षांपासून लिंबूला भाव मिळत नसल्याने ज्ञानेश्वर नागलकर आर्थिक संकटात सापडले आहेत. पाच एकरांतील लिंबू लागवडीपासून मशागतीचा दरवर्षी एक लाख खर्च आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास पाच लाखांवर खर्च करण्यात आला. मात्र, गेले तीन वर्षांपासून लिंबूला चांगला भाव मिळत नसल्याने कर्जामध्ये सतत वाढ होत असल्याने, शेतकरी ज्ञानेश्वर नागलकर हे आर्थिक संकटात सापडले असून, पाच एकरांतील लिंबू काढून त्यांनी नाल्यात फेकून देत, शासनाच्या शेतकरी विराेधी धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली.
फोटो:
१५ किलोंची बॅग नेण्याचा खर्च ९० रुपये!
लिंबूची १५ किलोंची बॅग बाजारपेठेत नेण्यासाठी ९० रुपये खर्च येतो. मात्र, बाजारपेठेमध्ये १५ किलोंच्या बॅगेला ९० ते १०० रुपये दर मिळतो. त्यामुळे खर्चही निघत नसल्याने शेतकरी ज्ञानेश्वर नागलकर हतबल झाले आणि शेतातील लिंबू काढून त्यांनी नाल्यात फेकले. शासनाने सर्व्हे करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
लिंबू लागवडीवर केलेला खर्च निघत नाही. १५ किलोंच्या बॅगेमागे ९० रुपये खर्च येतो. त्यामुळे पाच एकरांतील लिंबू काढून फेकले. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.
-ज्ञानेश्वर नागलकर, शेतकरी सावरगाव
आठ लाख कर्जाची परतफेड करणार कशी?
ज्ञानेश्वर नागलकर यांनी लिंबू लागवडीसह मशागत, तसेच इतर पिकांची पेरणी करण्यासाठी एचडीएफसी बँकेकडून आठ लाख रुपये कर्ज घेतले आहे. मात्र, लिंबूला भाव नसल्याने कर्जाची परतफेड कशी करणार असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.