पीक विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढला !

By admin | Published: July 24, 2015 12:57 AM2015-07-24T00:57:37+5:302015-07-24T00:57:37+5:30

३१ जुलै शेवटचा दिवस; व-हाडातील शेतकर्‍यांना मिळाले गतवर्षीचे २७९ कोटी; १४२ कोटीची प्रतीक्षा.

Farmer's trend increased in relation to crop insurance | पीक विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढला !

पीक विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढला !

Next

अकोला : पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी आतापर्यंत ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; परंतु पावसाची अनियमितता बघता शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्यावर जोर दिला आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंतच असल्याने बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. दरम्यान, पीक विम्यापोटी आलेले मागील वर्षाचे १४२.२ कोटी शेतकर्‍यांना अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.
यंदा पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांना पीक विम्याची ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. यात हवामानावर आधारित पीक विम्याचे ७६.४0 कोटी मिळाले आहेत; पण रक्कम मिळण्यास होणार्‍या दिरंगाईमुळे आतापर्यंत केवळ २७९.0६ कोटी रूपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळाली असून, १४२.0२ कोटी रुपये मिळण्यासाठी शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. या पाचही जिल्हय़ांमध्ये आतापर्यंत सरासरी २३३ मि.मी. एवढाच पाऊस झाल्याने पुढे पाऊस येईल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. असे असले तरी वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे. २१ जुलैपर्यंत पश्‍चिम विदर्भातील २७ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्याकडे कल वाढला आहे.

*४२१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई
पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मागील वर्षाचे ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. यात अकोला जिल्हय़ाला १0९ कोटी २७ लाख रुपये मिळाले आहेत. बुलडाणा जिल्हय़ाला ९१ कोटी, वाशिम ५७ कोटी ९९ लाख, यवतमाळ ७८ कोटी ९0 लाख, तर अमरावती जिल्हय़ाला ८३ कोटी ४५ लाख रुपये नुकतेच मिळाले आहेत; पण यातील १४२.२ कोटी रुपये थकले आहेत.

Web Title: Farmer's trend increased in relation to crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.