वऱ्हाडात फळ पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 07:18 PM2018-03-26T19:18:50+5:302018-03-26T19:18:50+5:30
अकोला : मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.
अकोला : विदर्भात गतवर्षी पूरक पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम आता फळ पिकांवर होत असून, फळबागा वाचविण्यासाठी कृषी विद्यापीठासह शेतकºयांना आटापिटा करावा लागत आहे. मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.
मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील प्रशासनाने ५० टक्क्यांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यास अगोदरच प्रतिबंध घातला होता. पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांमधील जलपातळी आजमितीस सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. परिणामी अनेक ठिकाणी विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतकºयांपुढे फळबागा जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विदर्भात संत्र्याचे सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर क्षेत्र आहे; परंतु पूरक पाऊस न झाल्याने वातावरणात आर्द्रता नाही. तसेच पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यात केळीचे क्षेत्र ८२ हजार हेक्टर असून, द्राक्षे ९० हजार, पेरू ३९ हजार, आंबा ४८२ हजार, पपई १० हजार, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार, चिकू ७३ हजार व इतर फळ पिके ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहेत. रोजगार हमी योजना व राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत या राज्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली आहे. म्हणूनच फळ पिकांबाबत महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु ५० फूट खोलीवर लागणारे पाणी आता ३०० ते ३५० फूट खोल जाऊनही लागत नसल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले.
यावर्षीच्या उन्हाळ््यात आतापासूनच तापमान प्रचंड वाढल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. संत्र्याचे पीक गारपिटीने एकीकडे उद्ध्वस्त होत असताना, दुसरीकडे पाणी नसल्याने झाडाला लागलेली संत्री पिवळी पडत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने टॅँकरने पाणी देऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
- पावसाचे दिवस कमी झाले असून, भूगर्भातील पातळी खोल गेली आहे. त्याचे हे परिणाम आहेत आता पाण्याची बचत करावी लागणार असून, भूगर्भात जलसाठा साठविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपचार करावे लागणार आहेत.
- डॉ. सुभाष टाले,विभागप्रमुख, मृद व जल संधारण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.