विदर्भातील शेतकऱ्यांचा ओवा लागवडीकडे कल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:40 PM2020-01-24T13:40:50+5:302020-01-24T13:40:56+5:30
इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन व उत्पन्न जास्त असल्याने विदर्भातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे.
अकोला : विदर्भात ओवा लागवडीवर भर देण्यात येत आहे. यामुळे पारंपरिक पिकांसोबतच अधिक उत्पादन व उत्पन्न देणाºया मसाले पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे लागवड तंत्रज्ञान शेतकºयांना समजावून सांगण्यात येत आहे. यावर्षी खारपाणपट्ट्यात ओवा लागवड करण्यात आली असून, बाजारात आजमितीस प्रति क्ंिवटल १४ हजार रुपये दर आहेत.
ओवा मसाले पीक आता नगदी पीक म्हणून पुढे आले आहे. इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन व उत्पन्न जास्त असल्याने विदर्भातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याअगोदरच बुलडाणा जिल्ह्यातील शेगावसह देशातील इतर बाजारपेठेत येथील ओवा पाठविण्याची शिफारस शासनाला केली आहे. ओवा पीक तसे उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सरासरी १३ ते १४ हजार रुपये प्रति क्ंिवटल भाव व उत्पादन खर्च मात्र कमी असल्याने पश्चिम विदर्भातील शेतकºयांनी या पिकाची कास धरली आहे. म्हणूनच पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या चार जिल्ह्यांत ओव्याचे क्षेत्र ३ हजार ५०० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.
शेतकºयांना ओवा बियाणे सहज उपलब्ध व्हावे म्हणून कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर एका खास जातीचे बीजोत्पादन घेतले असून, यावर्षी १२ ते १४ क्विंटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न दिले आहे. ओवा आता शेगावसह अकोला, अकोट, खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री करण्यात येत आहे.
ओवा हमखास नफा देणारे पीक असल्याने रब्बी पीक पद्धतीत या पिकाचा समावेश करावा, यासाठीची मान्यता राज्यस्तरीय संयुक्त कृषी संशोधन परिषदेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मिळाली आहे. या मान्येतनंतर रब्बी पीक पद्धतीत या पिकाचा समावेश करण्यात यावा, यासाठीची शिफारस कृषी विद्यापीठाने शासनाकडे केली होती. त्यालादेखील मान्यता प्राप्त झाली आहे.
खारपाणपट्ट्यात पाण्याचा अभाव!
खारपाणपट्ट्यात पाण्याचा अभाव असून, पाणी प्रचंड खारट असल्याने या भागात आॅगस्ट महिन्यात पेरणीची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये ओेवा पीक हातात येईल.
- ओवा पीक आता नगदी पीक म्हणून समोर येत असून, शेतकरी या पिकाकडे वळला आहे. उत्पादन लागत काढून हमखास नफा मिळवून देणारे हे पीक आहे.
डॉ. एस. एम. घावडे, शास्त्रज्ञ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
अकोला.