विदर्भातील शेतक-यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2016 11:35 PM2016-06-21T23:35:01+5:302016-06-21T23:35:01+5:30
गत चोविस तासात लोणार, चिखली तीन तर खामगाव, रिसोड व अहेरी येथे केवळ एक सें.मी. पाऊस.
अकोला: निम्मा जून संपला असून, अद्याप दमदार मॉन्सूनचे आगमन झाले नसल्याने बळीराजासह सगळ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीस तोंड देत असलेल्या जिल्ह्यातील जनतेला हवामान खात्याच्या चांगल्या पावसाच्या अंदाजाचा प्रत्यय अजूनपर्यंत आलेला नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा खरीप हंगामातील पिकांचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती असल्याने बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, मागील चोविस तासात विदर्भात बुलडाणा जिल्हय़ात चिखली, लोणार येथे तीन, खामगाव व अहेरी येथे एक सें.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दररोज हवामान खात्याकडून पावसाचे अंदाज वर्तविले जात आहेत; मात्र सगळेच खोटे ठरत असल्याने सगळ्यांचाच विशेषत: बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. दोन दिवस आलेल्या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या. अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली आहे; परंतु पुन्हा रविवारी पावसाने दडी मारल्याने बळीराजावरचे संकट वाढले आहे.
एक दिवस येऊन पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या काळजाचे ठोके वाढत आहेत. मुक्या जनावरांचा चारा कधीचाच संपला असून, चारा विकत घेणेही आवाक्याबाहेरचे झाले आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीस कापूस, सोयाबीन तसेच मूग, उडीद, तूर अशा कडधान्यांची पेरणी करून, त्यानंतर इतर पिकांसाठी जमीन मोकळी केली जाते; मात्र पाऊस लांबत असल्याने कडधान्य उत्पादनावर व पुढील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस उत्तरेकडे
मागील २४ तासात २१ जून रोजी सकाळी ८.३0 वाजतापर्यंत नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा आणखी उत्तरेकडे सरकली आहे, तसेच मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग,पूर्व मध्यप्रदेश व बिहार, पश्चिम मध्यप्रदेशचा बहुतांश भाग, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश, संपूर्ण जम्मू-काश्मीर व पश्चिम उत्तरप्रदेशच्या भागात मोसमी पावसास सुरुवात झाली आहे.