शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आस!

By Admin | Published: April 8, 2017 01:13 AM2017-04-08T01:13:45+5:302017-04-08T01:13:45+5:30

शेतमालास हवा योग्य भाव : उगवा येथील शेतकऱ्यांच्या भावना

Farmers want debt relief! | शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आस!

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आस!

googlenewsNext

संतोश येलकर - अकोला
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र संपविण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी आणि शेतमालास योग्य भाव देण्याचे धोरण केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा भावना जिल्ह्यातील उगवा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसदारांसह शेतकऱ्यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.
नापिकी आणि कर्जाच्या चक्रव्यूहात अडकल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीची आस निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर सरकारने राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करावे, यासंबंधीची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर सन २०१२ ते २०१६ या पाच वर्षांच्या कालावधीत १० शेतकरी आत्महत्या झालेल्या खारपाणपट्ट्यातील अकोला तालुक्यातल्या उगवा येथील शेतकऱ्यांच्या भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या असता, शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी सरकारने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने शेतमालास योग्य भाव देण्याचे धोरण सरकारने निश्चित केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा भावनाही या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसदारांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

खर्चही निघत नाही; कर्जाची परतफेड कशी करणार?
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीची मशागत, बियाणे, पेरणीसाठी खर्च केल्यानंतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण होत असताना, कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, शेतमालाला योग्य भाव देण्याचे धोरण निश्चित करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत उगवा येथील शेतकऱ्यांनी मांडले.

भाव अत्यल्प; सोयाबीन, तूर, हरभरा घरातच!
यावर्षी सोयाबीन, तूर, हरभरा पिकाचे उत्पादन चांगले झाले; मात्र शेतमालास बाजारात अत्यल्प भाव मिळत आहे. शेतमालास कमी भाव मिळत असल्याने खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी शेतमाल अद्यापही घरातच पडून आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतमाल घरातच ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, अशी व्यथा शेतकरी श्याम पाठक यांनी मांडली.

Web Title: Farmers want debt relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.