बैलजाेड्या चाेरी गेलेल्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:26+5:302020-12-23T04:16:26+5:30
अकाेला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा जास्त बैलजाेड्या चाेरीस गेल्या असून, या प्रकाराचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. ...
अकाेला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा जास्त बैलजाेड्या चाेरीस गेल्या असून, या प्रकाराचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. या शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत पाेलीस प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा पाढा वाचत मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणामध्ये लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा अधिक बैलजाेड्या व गायी चाेरीला गेल्या आहेत. या चाेरीच्या तक्रारी पाेलीस ठाण्यात करण्यात आलेल्या आहेत. मात्र अकाेला पाेलिसांनी अद्याप एकाही बैलजाेडी चाेरीचा तपास न केल्याने पाेलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत या शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या बैलजाेड्या चाेरट्यांचा जिल्हाभर धुडगूस सुरू असताना पाेलीस मात्र एकाही चाेरट्याला अटक करीत नसल्याने जिल्ह्यातील सांगळूद, पळसाे बढे, दहीगाव, बाेरगाव मंजू, धाेतर्डी, उरळ, गाेत्रा, गुडधी यांसह अनेक गावांतील शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित हाेते. यासाेबतच सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही निवेदन देण्यासाठी आले हाेते. त्यांनी बैलजाेड्या तसेच गायींचा शाेध घेऊन या चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे.
पाेलीस अधीक्षकांनी घालावे लक्ष
तत्कालीन पाेलीस अधीक्षक अमाेघ गावकर यांच्या कार्यकाळात बैलजाेड्या चाेरीचे प्रमाण कमी हाेते. मात्र आता बैलजाेड्या चाेरीचे प्रमाण वाढले असून, पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या याकडे लक्ष नसल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात चाेरट्यांना चांगले दिवस आले असून, गरीब शेतकऱ्यांच्या बैलांची व गायींची खुलेआम कत्तल हाेत असतांना पाेलीस प्रशासन मात्र सुस्त असल्याची चर्चा आहे.