पेरणी उलटलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हवे मदतीचे ‘कवच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:00+5:302021-07-14T04:22:00+5:30
अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने दडी मारल्याने, जिल्ह्यातील विविध भागांत ...
अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने दडी मारल्याने, जिल्ह्यातील विविध भागांत पेरणीनंतर उगवलेली पिके करपल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पेरणीसाठी केलेला खर्च बुडाल्याने आता दुबार पेरणी कशी करणार, याबाबतचा प्रश्न कोरोनाकाळात आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यानुषंगाने पेरणी उलटलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाने मदतीचे ‘कवच’ देण्याची मागणी होत आहे. मात्र, त्यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात २० जूनपर्यंत अधूनमधून पडलेल्या पावसात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पेरणीनंतर पावसात खंड पडल्याने पेरणी केलेल्या शेतांमध्ये काही ठिकाणी पिके उगवली आणि काही ठिकाणी पिके उगवलीच नाहीत. पावसाने मारलेली दडी आणि तापत्या उन्हाच्या तडाख्यात सिंचन सुविधा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील विविध भागांत उगवलेले सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकेदेखील करपली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी पिके करपलेल्या शेतांत दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरला नाही. हातात असलेला पैसा पेरणीसाठी खर्च झाल्याने आता दुबार पेरणीचा खर्च कसा करणार, याबाबतचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पेरणी उलटलेल्या शेतांमध्ये दुबार पेरणीसाठी शासनाने मदतीचे कवच देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे; परंतु त्यासाठी पेरणी उलटलेल्या शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया संबंधित यंत्रणांकडून केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात केवळ ४४.८ टक्के
क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी!
जिल्ह्यातील सरासरी खरीप पेरणी क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८३ हजार हेक्टर असून, त्यापैकी ८ जुलैपर्यंत २ लाख ४९ हजार हेक्टर (४४.८ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.