शेतकरी विधवा भगिनीच्या कुटुंबाचे पुनर्वसन!
By admin | Published: January 11, 2016 01:54 AM2016-01-11T01:54:04+5:302016-01-11T01:54:04+5:30
शिवप्रभा व युवाराष्ट्र संघटनेचा पुढाकार
अकोला : तालुक्यातील कानशिवणी येथील एका शेतकरी विधवा भगिनीच्या कुटुंबाला बकरी गट भेट देऊन शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व युवाराष्ट्र संघटना अकोला या संघटनांनी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन दिले आहे. कानशिवणी येथील नलुबाई कैलास वाघमारे यांनी तीन वर्षांंपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा कसाबसा ओढला. केवळ एक एकर शेतीच्या बळावर चार मुलांचा सांभाळ त्या करीत होत्या. घर पडायला आले आहे. या कुटुंबाकडे दारिद्रय़रेषेचे कार्डही नाही. त्यामुळे शासकिय योजनांचा कोणताही लाभ त्यांना आतापर्यंंत मिळाला नाही. समाजातूनही आतापर्यंंत कुणी मदतीसाठी पुढे आले नाही. या कुटुंबाची स्थिती मन हेलावून सोडणारी होती. सगळे कुटुंब ८0 रुपयांच्या मजुरीवर संसाराचा गाडा हाकत आहेत. चार मुलांचे शिक्षण, आरोग्याचा खर्च एवढय़ाच मजुरीवर भागवावा लागत होता. या कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याचा खर्च उचलण्यासोबतच कुटुंबाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवप्रभा व युवाराष्ट्र संघटना धावून आल्या. रविवारी या भगिनीला उदरनिर्वाहासाठी ५ शेळ्या देण्यात आल्या. सोबतच ४ मुलांना कपडे, साडी-चोळी शैक्षणिक साहित्य, धान्य व औषधी पुरविण्यात आली. शिवप्रभाने या संवेदनशील उपक्रमासाठी मोठा वाटा उचलला. युवाराष्ट्र ही संघटना या परिसरात अनेक सकारात्मक उपक्रम राबवित आहे. रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमाला अमोल सैनवार यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमाला डॉ.नीलेश पाटील विलास ताथोड, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा यांची उपस्थिती होती. मनोहर खाडे, विठ्ठल खाडे, गजानन पातोड यांचे सहकार्य लाभले. कुटुंबाला हवे घर! घरकुलसारख्या योजनांच्या लाभापासून हे कुटुंब वंचित आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन या कुटुंबासाठी घरकुल मंजूर केल्यास या कुटुंबाच्या घराचा प्रश्नही सुटेल. ह्यमिशन दिलासाह्णने शेतकरी वर्गाच्या हृदयात स्थान मिळविणारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत या कुटुंबासाठीही पुढाकार घेतील, अशी पेक्षा युवाराष्ट्रच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली.