शेततळे खोदण्यासाठी त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम
By admin | Published: March 19, 2017 01:39 PM2017-03-19T13:39:30+5:302017-03-19T13:39:30+5:30
शेततळे खोदण्यासाठी अग्रीम स्वरूपात रक्कम त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लाभार्थी शेतकरी व मशीनधारक यांच्यात करार
बुलडाणा झ्र मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळे घेण्यासाठी
आकारमानानुसार 22 हजार 100 पासून 50 हजार रूपयांपर्यंत अनुदान
शेतकऱ्यांना देय आहे. शेततळे घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये नगदी स्वरूपात
पैसा नसल्याने शेततळे खोदण्यासाठी अग्रीम स्वरूपात रक्कम त्रिपक्षीय
करारामार्फत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार
त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना शेततळी खोदण्यासाठी अग्रीम देण्यात
येणार आहे. यासाठी शेततळे लाभार्थी शेतकरी व मशीनधारक यांचा करारनामा कृषि
सहाय्यकांच्या संयुक्त स्वाक्षरीने करण्यात येत आहे. सदरचा करारनामा
केल्यानंतर लाभार्थ्याला ज्या आकारमानाचे शेततळे मंजुर असेल, त्यासाठी
विहीत केलेल्या रक्कमेपैकी 20 टक्के इतकी रक्कम डिझेलसाठी अग्रीम म्हणून
देण्यात येत आहे. जे शेतकरी शेततळे घेण्यास इच्छूक असूनही केवळ आर्थिक
अडचणीमुळे शेततळे घेवू शकत नाही. त्या शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे. या
योजनेत सहभागी होण्याकरीता कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व नजीकच्या
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क करावा. शेततळे मंजूर
झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांची शेततळे तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. जे
शेतकरी शेततळे सुरू करणार नाहीत, त्यांना याबाबत सूचीत करून त्यांचे
शेततळे रद्द करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या
योजनेत सहभागी व्हावे व लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी यांनी केले आहे.