मंत्र्यांना फटके हाणल्याशिवाय शेतक-यांना न्याय मिळणार नाही!- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 02:35 PM2018-10-04T14:35:49+5:302018-10-04T14:36:02+5:30

केंद्र शासनाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत.

Farmers will not get justice without scolding ministers: Raju Shetty | मंत्र्यांना फटके हाणल्याशिवाय शेतक-यांना न्याय मिळणार नाही!- राजू शेट्टी

मंत्र्यांना फटके हाणल्याशिवाय शेतक-यांना न्याय मिळणार नाही!- राजू शेट्टी

Next

- विलास बोरचाटे 
निंबा : केंद्र शासनाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत. शेतकरी सातत्याने नागविला जात आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यासाठी शेतक-यांनी पेटून उठले पाहिजे. शेतक-यांनी शासनाच्या मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय, त्यांना जोडे मारल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मंत्र्यांना मारले तर पोलीस तुमचे काहीही करू शकत नाही. तुमच्यामुळे भाजप सत्तेत आहे. शासनाला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निंबा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक एकनाथ दुधे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर, बाळापूर तालुकाध्यक्ष श्रीकांत खरप, स्वाभिमानीचे नेते प्रा. प्रकाश पोफळे, वाशिमचे जिल्हाध्यक्ष दामूअण्णा इंगोले, अकोला जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी आदी होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस, दुधाची भाववाढ असे आंदोलन करून शेतक-यांना न्याय मिळवून दिला. आता विदर्भात कापूस, सोयाबीनचे दर घसरले. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत; परंतु शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी शासनाला असा अल्टिमेटम दिला. कापूस, सोयाबीनला भाव मिळाला नाही, तर  १९ आॅक्टोबरनंतर विदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. विदर्भातील शेतक-यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन एकही चाक फिरू देऊ नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. शासनाने शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, पश्चिम विदर्भात दुष्काळ जाहीर करावा, कापूस, सोयाबीनला उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५0 हजार रुपये द्यावेत, आदी मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे मांडल्या आहेत. असे सांगत, खासदार शेट्टी यांनी शासनाने सात लाख टन पामतेल विदेशातून आयात केले.

अंबानी, अदानींसारख्या उद्योजकांचे या शासनाला भले करायचे आहे. भाजपाचे शासन शेतक-यांचे नसून, उद्योजकांचे आहे, असा आरोप करीत त्यांनी सोयाबीनचे भाव शासनाने पाडल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन रवी मनसुटे यांनी केले. यावेळी इ. पहिलीतील विद्यार्थिनी विधी मनसुटे हिने शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. 

शेतक-यांनो, मंत्र्यांना फिरू देऊ नका - तुपकर

‘अच्छे दिन’च्या भूलथापा देऊन भाजपने सत्ता लाटली. त्यांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. कापूस, सोयाबीनचे भाव पाडण्याचे काम शासन करीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी त्यांच्या एकाही मंत्र्याला फिरू देऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. खासदार शेट्टी यांनी आदेश दिला, तर शेतक-यांच्या हितासाठी एखाद्या मंत्र्याचा मुडदा पाडायलासुद्धा आपण मागे-पुढे पाहणार नाही. आता शेतक-यांनी पेटून उठण्याची गरज आहे, असे मत तुपकर यांनी मांडले. उद्योजक एकनाथ दुधे यांनीसुद्धा विचार व्यक्त केले.

Web Title: Farmers will not get justice without scolding ministers: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.