शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबविणार प्रबोधनात्मक उपक्रम!
By Admin | Published: January 5, 2016 01:54 AM2016-01-05T01:54:18+5:302016-01-05T01:54:18+5:30
माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांची माहिती.
अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागांमार्फत योजना राबविल्या जात आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने देखील हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष पावले उचलण्याचे ठरविले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतकर्यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार असल्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सोमवारी दुपारी जिल्हा माहिती कार्यालयात पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली. दुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा विचार करणार्या शेतकर्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. शासनाच्या विविध योजना व निर्णय शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी कसोशीने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. या प्रयत्नांना यशाची जोड देण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नवोपक्रम हाती घेतला आहे. शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने येत्या फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हय़ातील ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकर्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी कीर्तन, भारूड, पथनाट्ये, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची व्याख्याने व चित्ररथाच्या माध्यमातून माहितीपट दाखविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत भुजबळ यांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्याही जाणून घेतल्या. पत्रपरिषदेला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, शौकतअली मिरसाहेब, सुधाकर खुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.