ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:32 AM2020-12-13T04:32:35+5:302020-12-13T04:32:35+5:30
बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे ...
बाळापूर: ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या धुक्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतशिवारात रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे. तसेच तुरीच्या पिकाला शेंंगा लागलेल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, तर तुरीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक फवारणीची लगबग शेतशिवारात दिसून येत आहे.
सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांची मोठी हानी झाली. लावलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. तुरीचे पीक चांगले येईल, अशी आशा बाळगून असताना तालुक्यातील ग्रामीण भागात तूर पिकावर अळीने थैमान घातले आहे. तूर पीक वाचविण्यासाठी शेतशिवारात फवारणी करण्यात येत आहे.
तालुक्यातील टाकळी खुरेशी, माणकी, खिरपुरी, व्याळा, देगाव, बोरगाव वैराळे, अंदुरा, निमकर्दा, शिंगोली, दुधाळा, लोणाग्रा, मालवाडा, मंडाळा, टाकळी खोजबळ या परिसरात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे; मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलोऱ्याची गळती होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे.
रब्बी हंगामात यंदा हरभऱ्याची पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक अंकुरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे कृषी विभागाने परिसरात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
------------------------------
यंदा खरीप हंगामात लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- प्रमोद सिरसाट, शेतकरी, मानकी