ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:30+5:302021-03-23T04:20:30+5:30
दहावी, बारावी परीक्षांची तयारी तेल्हारा : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ...
दहावी, बारावी परीक्षांची तयारी
तेल्हारा : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
वाढीव वीज दर कमी करण्याची मागणी
बार्शीटाकळी : कोरोना संक्रमण काळात छुप्या वाढीव दरामुळे सध्या वीज बिलांच्या रकमा वाढलेल्या आहेत. वाढीव दराचे परिपत्रक रद्द करून जुन्या वीज दराप्रमाणे ग्राहकांना वीज बिले द्या, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
पाच दिवसांचा आठवडा; नागरिक त्रस्त
बाेरगाव मंजू : पाच दिवसांच्या आठवड्याने शासकीय कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. यापासून वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याने गावांचा अपेक्षित विकास होण्यास अडचणी आहेत.
मूर्तिजापूर येथे आज कोरोना तपासणी
मूर्तिजापूर : कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन निर्देशानुसार मूर्तिजापूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती (राष्ट्रीय महामार्गावरील) येथे मंगळवार, २३ मार्च रोजी १० ते ३ वाजेपर्यंत कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आठवडी बाजार बंद; शेतकरी संकटात
बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
बंदी असतानाही गुटख्याची विक्री
बाळापूर : बंदी असतानाही तालुक्यातील अनेक भागांत गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करीत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
इंधन दरवाढ; यांत्रिक मशागत महागली!
हिवरखेड : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे.
कोरोनामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा फटका
अकाेट : गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.
रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या
वाडेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, तसेच चौकालगत भाजी, फळ तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज आहे.
बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण
हाता : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे या संधीचा लाभ घेत खासगी वाहनचालकांनी भाडेवाढ केली आहे.
‘माकडांपासून होणारा त्रास थांबवा!’
खानापूर : परिसरात माकडांनी गत काही दिवसांपासून धुडगूस घातला आहे. माकडे शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. माकडांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.