कारंजातील धान्य व्यापारी पोलीस कोठडीत
By admin | Published: December 7, 2015 02:37 AM2015-12-07T02:37:06+5:302015-12-07T02:37:06+5:30
चोरट्यांनी लंपास केलेली ४0 क्विंटल डाळ व्यापा-याकडून जप्त.
अकोला: शहरातील एमआयडीसी क्रमांक ३ परिसरातील राधा उद्योगातून चोरट्यांनी लंपास केलेली ४0 क्विंटल उडदाची डाळ खरेदी केल्याच्या आरोपावरून सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी कारंजा लाड येथील धान्य व्यापारी विनेश रामजीभाई कारिया (४६) याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला ८ डिसेंबरपर्यंंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पंकज शंकरलाल बियाणी यांच्या एमआयडीसीतील राधा उद्योग दाल मिलमधून २७ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्याने ४0 क्विंटल मूग व उडदाची डाळ लंपास केली होती. या डाळीची किंमत ७ लाख रुपये आहे. बियाणी यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून डाळ चोरीचा तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीची डाळ कारंजा लाड येथील धान्य व्यापारी विनेश कारिया याने खरेदी केल्याचे समोर आले.
पोलिसांनी कारंजा लाड येथे पोहोचून त्याच्याकडील चोरीची डाळ जप्त केली आणि व्यापारी विनेश कारिया याला अटक केली. परंतु अद्यापपर्यंंंत कारिया याने ही डाळ कोणाकडून खरेदी केली, याचा खुलासा होऊ शकला नाही. पोलीस कोठडीदरम्यान व्यापार्याकडून चोरट्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.