शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात ६६८ परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:48+5:302021-07-08T04:13:48+5:30
अकाेला जिल्ह्यातील अकाेला, आकाेट, मूर्तिपूर, बाळापूर, तेल्हारा, पातूर व बार्शिटाकळी तालुका अशा सात तालुक्यात तब्बल ६६८ शस्त्र परवाने देण्यात ...
अकाेला जिल्ह्यातील अकाेला, आकाेट, मूर्तिपूर, बाळापूर, तेल्हारा, पातूर व बार्शिटाकळी तालुका अशा सात तालुक्यात तब्बल ६६८ शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक परवाने हे अकाेला तालुक्यात देण्यात आले असून, सर्वात कमी परवाने पातूर तालुक्यात देण्यात आल्याची माहिती आहे. स्वरक्षणासाठी असलेल्या शस्त्र परवान्यांची क्रेझ वाढली असून, मागील पाच वर्षांपासून कुणीही शस्त्र परवान्यासाठी अर्ज करीत आहे. मात्र परवान्याला मंजुरी मिळण्याची किचकट प्रक्रियेतून त्यांना मंजुरीच मिळत नसल्याने ही क्रेझ त्याच प्रमाणात कमी हाेत असल्याचेही वास्तव आहे.
जिल्ह्यातील एकूण शस्त्र परवाने ६६८
तालुकानिहाय
अकाेला १६२
अकाेट १०२
मूर्तिजापूर ९५
तेल्हारा ८९
बाळापूर ९१
बार्शिटाकळी ६८
पातूर ६१
अकाेला जास्त; पातूर कमी
अकाेला तालुक्यात सर्वात जास्त शस्त्र परवाने देण्यात आले असून, सर्वात कमी शस्त्र परवाने पातूर तालुक्यात देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. अकाेला तालुक्यानंतर आकाेट तालुक्यात शस्त्र परवाने देण्यात आले आहेत.
सात वर्षात वाढले परवाने
गत सात वर्षांमध्ये शस्त्र परवाने काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यापूर्वी शस्त्र परवाने खूप कमी प्रमाणात हाेते. मात्र गत सात वर्षांमध्ये हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. यावरून शस्त्र परवान्यांची एक प्रकारे फॅशनच आल्याचे वास्तव आहे.
शस्त्र सांभाळणे कठीण
परवाना असलेल्या शस्त्राव्दारे कुटुंबातील किंवा इतर कुणीही गुन्हा केल्यास त्याला जबाबदार शस्त्र परवानाधारक आहे. त्यामुळे शस्त्र सांभाळणेही माेठे कठीण आहे. त्यामुळे शस्त्र परवान्याची नितांत गरज असेल तरच काढावा अन्यथा ताे तुमच्या आयुष्याची राखरांगाेळीपण करू शकताे, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अकाेल्यात गुन्हा नाही
परवाना असलेल्या शस्त्राने अकाेल्यात गुन्हा घडला नसल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. अकाेल्यात बंदुकीच्या गाेळ्या झाडून हत्या झालेल्या आहेत. मात्र हे सर्व शस्त्र बेकायदेशीर आणि विनापरवाना असल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक शस्त्र हे देशीकट्टा असल्याची माहिती आहे.