दररोज ३० ते ३५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:16+5:302021-07-26T04:18:16+5:30
अकोला : गरिबांना पोटभर जेवण मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली; मात्र शहरातील केंद्रांवर मंजूर थाळींची ...
अकोला : गरिबांना पोटभर जेवण मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली; मात्र शहरातील केंद्रांवर मंजूर थाळींची संंख्या कमी असल्याने दररोज ३० ते ३५ जणांना जेवणाअभावी परत जावे लागत आहे. दिवसभर काम करताना त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे विदारक चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण १९ शिवभोजन केंद्रे आहेत. त्यात ४१०० थाळ्या लाभार्थींना दिल्या जात आहेत. ग्रामीण भागातून शहरात दररोज येणारे नागरिक आणि शहरातील लाभार्थींची संख्या पाहता शहरात विविध भागात ५ केंद्रे कार्यरत आहेत. त्यातून केवळ १५०० लाभार्थींना भोजन दिले जाते; मात्र सध्या लाभार्थींची वाढलेली संख्या पाहता काहींना उपाशीपोटीच रहावे लागत आहे. त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्र - १९
रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या - ४१००
शहरातील एकूण शिवभोजन केंद्र - ५
शहरातील रोज थाळींची संख्या - १५००
३० जण उपाशीपोटी परतले!
सर्वोपचार रुग्णालयातील केंद्र : येथील सर्वोपचार रुग्णालयात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. शेकडो रुग्णांना येथील शिवभोजन केंद्राचा आधार आहे; परंतु थाळींची संख्या कमी असल्याने जवळपास ५० जण उपाशीपोटी परतत आहेत.
बाजार समितीत केंद्र : शहरातील बाजार समितीत दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी येतात. गोरगरीब शेतकरी व बाजारात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची येथील शिवभोजन केंद्रावर गर्दी असते. या केंद्रात देखील लवकरच थाळींचा कोटा संपतो. त्यामुळे अनेकांना उपाशी परत जावे लागते किंवा अन्य ठिकाणी गरिबांच्या खिशाला न परवडणारे जेवण घ्यावे लागते.
दररोज चार हजार जणांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?
जिल्ह्यात दररोज ४१०० थाळींचे वितरण केले जाते; मात्र अनेकांना उपाशीपोटी परतावे लागते.
ही परिस्थिती पाहता बहुतेक केंद्रांवर थाळींचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.