महिला शक्ती’च्या मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:22 PM2019-04-14T13:22:43+5:302019-04-14T13:23:13+5:30
अकोला: लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत. अकोला लोकसभा मतदारसंघामधील एकूण मतदारांपैकी ४८.0१ टक्के महिला मतदार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत. अकोला लोकसभा मतदारसंघामधील एकूण मतदारांपैकी ४८.0१ टक्के महिला मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत महिला शक्तीचे पाठबळ कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार आहे, या निवडणुकीत महिला शक्तीच्या मतांची भूमिका निर्णायक ठरणार आहे; परंतु महिला शक्ती मत कोणाच्या पारड्यात झुकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना उमेदवारांसाठी मतदारांमधील पुरुष, महिला आणि युवक यापैकी कोणता घटक महत्त्वाचा ठरणार, याची चर्चा सुरू आहे. उमेदवारांना संसदेत पाठविण्यासाठी जशी युवक मतदारांची आवश्यकता आहे, तशीच महिला मतदारांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. गत चार लोकसभा निवडणुकांमध्ये महिला शक्तीने पुरुषांच्या खालोखाल मतदान करून महिला शक्तीही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. यंदा महिला शक्ती कोणाच्या पारड्यात अधिक मते टाकतात. त्यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
४८ टक्के महिला मतदार अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यांची संख्या ८ लाख ९२ हजार १५९ आहे.
५५.९० टक्के हे गेल्या निवडणुकीतील महिला मतदानाचे प्रमाण आहे. २०१४ च्या लोकसभेत ४ लाख ३४ हजार ५९ महिलांनी मतदान केले.
५८.५० टक्के हे मागील (२०१४) लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी आहे. एकूण ९ लाख ७८ हजार ४९१ मतदान झाले होते. त्यापैकी ५५.९0 टक्के मतदान हे महिलांचे होते. त्यामुळे महिला मतदारांचा वाटा महत्त्वाचा ठरणार आहे.
महिलांचा वाटा महत्त्वाचा
लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदार १८ लाख ५७ हजार ९५१ आहे. त्यापैकी ८ लाख ९२ हजार १५९ मतदार महिला आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक राहणार आहे.