इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला सोमवारी; २५ हजार ८५८ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
By नितिन गव्हाळे | Published: May 25, 2024 06:33 PM2024-05-25T18:33:42+5:302024-05-25T18:34:57+5:30
इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून २५ हजार ८५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावीचा निकाल सोमवार २७ मे रोजी जाहीर करणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून २५ हजार ८५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. इयत्ता दहावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्या इ. दहावीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. दहावीची बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला १३ हजार ५४२ मुले व १२ हजार ३१६ मुली परीक्षेला बसल्या होत्या. जिल्ह्यातील १२१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.
परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. परीक्षेच्या काळात जिल्ह्यात कॉपी करताना केवळ ८ विद्यार्थी आढळून आले होते. बोर्डाने या विद्यार्थ्यांना निलंबित केले होते. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल निकाल ९३.६२ टक्के लागला होता. अपेक्षेप्रमाणे मुलींचाच बोलबाला होता. मुलींच्या निकालाची टक्केवारी तब्बल ९५.८६ होती. गतवर्षी ४९१ शाळांपैकी तब्बल २५९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. यंदा किती शाळांची निकाल १०० टक्के लागतो आणि किती मुले व मुलींमध्ये कोण निकालात बाजी मारते. याची उत्सुकता लागलेले आहे.
या संकेतस्थळांवर होणार ऑनलाइन जाहीर
अमरावती विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.mahahsscboard.in, https://results.digilocker.go.in २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.