वडिलांवर कर्जाचा डोंगर; शेतकरीपुत्राची आत्महत्या
By admin | Published: August 14, 2015 11:13 PM2015-08-14T23:13:48+5:302015-08-14T23:53:36+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयाचा होता विद्यार्थी.
आगर (अकोला): वडिलांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच असल्याने खांबोरा येथील शेतकरीपुत्राने १0 ऑगस्ट रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. वैभव रामेश्वर ढोरे हे या शेतकरीपुत्राचे नाव असून, गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो शेगाव येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. रामेश्वर ढोरे यांच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यांनी पिकासाठी सोसायटीकडून ७0 हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच खासगी वित्तीय संस्थेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यांचा मुलगा वैभवने दोन वर्षांंपूर्वी शेगाव येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सततच्या नापिकीमुळे वडिलांवर कर्जाचा डोंगर वाढतच असून, वडील संसाराचा गाढा कसा ओढतील, अशी चिंता त्याने नातेवाईकांजवळ व्यक्त केली होती. दरम्यान, वैभवने १0 ऑगस्ट रोजी शेगाव येथे विष प्राशन केले. त्याला तातडीने अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, १३ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला