नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:56 AM2019-11-29T10:56:10+5:302019-11-29T10:56:20+5:30
बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडताच या नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका नराधम बापाने पोटच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार के ल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडताच या नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात एक १५ वर्षीय पीडितेस तिच्या आईने पोट दुखतेय म्हणून बुधवारी उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. प्रकरण गंंभीर असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाच्यावतीने एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एमआयडीसीचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी पीडितेला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, त्यांच्याही पायाखालची वाळूच सरकली. बापानेच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोपी नराधम बापाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आरोपी असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे नराधम बापाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, तसेच पोस्को कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.