बापानेच केला मुलाचा खून
By admin | Published: June 22, 2017 04:39 AM2017-06-22T04:39:38+5:302017-06-22T04:39:38+5:30
हेंडज येथील घटना; कांद्याचे कट्टे विकण्यावरून झाला वाद.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर /हातगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान बापाने कुर्हाडीने वार करून मुलाचा खून करण्यात झाले. मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथे २१ जूनच्या सकाळी ९.३0 च्या दरम्यान ही घटना घडली.
हेंडज शेतशिवारात एका युवकाचा खून झाल्याची माहिती मिळताच ठाणेदार एपीआय नितीन पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. बाळू किसन मसके यांच्या शेतात योगेश बाळू मसके या २३ वर्षीय युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. योगेशचे वडील बाळू यांच्याकडे विचारणा केली असता ते इतरांची नावे सांगू लागले. ठाणेदार पाटील यांनी लगेच अकोल्याहून श्वान पथकास पाचारण केले. ४.३0च्या दरम्यान उपनिरीक्षक सुजीत डागरे, हे.काँ. अनिल जगताप व पोलीस नायक तथा श्वानाचे प्रथम परीक्षक व नियंत्रक राजीव चौधरी हे हिरा नामक श्वानासह घटनास्थळी पोहोचले. योगेशच्या मृतदेहाच्या बाजूला मातीत खुपसून ठेवलेल्या कुर्हाडीच्या दांड्याचा वास घेऊन हिरा श्वानाने सरळ गर्दीत उभ्या असलेल्या बाळू किसन मसकेचा हात पकडला. त्यानंतर बाळू मसके याने आपणच मुलाचा खून केल्याचे कबूल केले. योगेश नेहमीच दारूच्या व्यसनापायी घरातील धान्य विकायचा, त्यामुळे बाप-लेकात नेहमीच वाद होत असत. बुधवारीदेखील कांद्याचे कट्टे विकण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान सरळ बापाने कुर्हाडीचे घाव घालून मुलाची हत्या करण्यात झाले. एसडीपीओंनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनात आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंंत सुरू होती. महल्ले, ठाकूर, प्रांजळे, इचे, श्रीकांत बोरोकार यांनी तपासकार्यात मदत केली.