‘एफडीए’ करणार रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:45 PM2019-07-20T13:45:51+5:302019-07-20T13:46:09+5:30
अकोला : रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर पडणार आहे. राज्यातील बहुतांश भागात २२ जुलैपासून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
- प्रवीण खेते
अकोला : रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर पडणार आहे. राज्यातील बहुतांश भागात २२ जुलैपासून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून, त्यांना स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
कुठल्याही खाद्य पदार्थाची विक्री करण्यासाठी विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करून तसा परवाना मिळविणे बंधनकारक आहे; मात्र राज्यात सर्वत्र रस्त्यावर विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असले, तरी त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. शिवाय, यातील बहुतांश विक्रेत्यांना नियमावलीचे ज्ञानदेखील नसल्याचे वास्तव आहे. ही परिस्थिती पाहता अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश भागात २२ जुलैपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येणार असून, विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उघड्यावर अन्न शिजवण्यास परवानगी नाही
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर अन्न शिजवण्यास परवानगी नाही; पण राज्यात सर्रास उघड्यावर अन्न पदार्थ शिजवून त्याची विक्री केली जाते. तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीला परवानगी असली, तरी अशाही पदार्थांची विक्री नियमांना डावलून केली जात आहे.
ग्राहकांमध्येही हवी जनजागृती
अन्न व औषध प्रशासनातर्फे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाºयांना मार्गदर्शन केले जाणार आहे; मात्र त्यानंतरही खाद्यपदार्थ विक्रेत्याने नियमांची अंमलबजावणी केली नाही, तर ग्राहकांनी तक्रार कशी करावी, कोणाकडे करावी, यासंदर्भात संबंधित दुकानातच जनजागृतीचे फलक लावण्याची गरज आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याच्या उद्देशानं रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाºया सर्वच खाद्यपदार्थ विक्रेत्याने अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. या अनुषंगाने लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवाय, या विक्रेत्यांना मार्गदर्शनही करण्यात येईल.
- लोभसिंग राठोड, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अकोला