झुडपांमुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:20 AM2020-12-06T04:20:17+5:302020-12-06T04:20:17+5:30
--------- वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान अडगाव : यंदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरणी आटोपत आली असून, ...
---------
वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान
अडगाव : यंदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरणी आटोपत आली असून, आता रब्बी पीक बहरत असताना वन्य प्राण्यांनी हैदोस घालत या पिकांची नासाडी सुरू केल्याने ही पिके संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
वीज पुरवठा खंडित; नागरिक त्रस्त!
बार्शीटाकळी: तालुक्यातील ग्रामीण भागात विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच कृषी पंपांचाही वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे.
रोजगार देण्याची मागणी
चोहोट्टा बाजार: परिसरातील गावात शेकडो कामगार परत आले आहेत; मात्र परिसरात शेतीशिवाय कोणतीच कामे नसल्याने हे कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवकांकडून करण्यात आली आहे.
पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
पिंजर: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे अनेक भागात पथदिवे बंद आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात रात्रीच्या वेळी अंधारात ग्रामस्थांना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
पीक कर्जाची प्रतीक्षा कायम
पारस : येथील शेकडो शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळूनही आधार प्रमाणिकरणाअभावी यंदाच्या हंगामात पीक कर्ज मिळण्यास विलंब होत आहे. २३ नोव्हेंबरपर्यंतही अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेच नाही.
देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था
वाडेगाव: देगाव ते वाडेगाव या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे असून, खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरून वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा मागणी करीत ग्रामस्थ करीत आहेत.
रब्बीची कामे अंतिम टप्प्यात
माना : मूर्तिजापूर तालुक्यातील माना, कुरूम परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, पेरणी झालेल्या शेतामध्ये पिके जोमाने अंकुरली असल्याने शेतकरी वर्ग समाधानी दिसत आहे. परिसरात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढणार असून, त्यात गहू, हरभऱ्याच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा
आपातापा: येथील अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन तूर, कपासी, या पिकांसाठी पीक विमा काढला; परंतु नुकसानग्रस्त शेतक-यांना केवळ सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठीच विमा मंजूर केला असून, कारपा येथील नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना विमाभरपाईची प्रतीक्षा कायमच आहे.