कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला; अकोला जिल्ह्यात एकही रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 10:38 AM2021-05-20T10:38:32+5:302021-05-20T10:38:38+5:30
Akola News : यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने कुणाचाही बळी घेतल्याची नोंद नाही.
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी आणि मे महिन्यात कडक निर्बंध लागू असल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. विविध आजारांचे रुग्णही घरीच आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाल्याचे चित्र आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने कुणाचाही बळी घेतल्याची नोंद नाही. दरवर्षी उन्हाळ्याला सुरुवात झाली की, उष्माघातापासून संरक्षण कसे करावे? याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान तापमान साधारणत: ३९ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावेत, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते, मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून येत नाही. कडक निर्बंधांमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने बहुतांश नागरिकदेखील घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताने कुणाचा बळी गेल्याची घटना घडली नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मागील वर्षीदेखील २४ मार्चपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे उन्हाळ्यात बहुतांश नागरिक घरातच होते. गतवर्षीदेखील जिल्ह्यात उष्माघाताने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. कोरोनापूर्वी उष्माघातापासून बचाव म्हणून सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जात होती. गत दीड वर्षापासून कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांवर उपचार करण्याकामी व्यस्त असल्याचे दिसून येते. उष्माघातासंदर्भात यंदा फारशा उपाययोजना दिसून येत नाहीत. दुपारच्या सुमारास सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.
ऊन वाढले तरी...
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात साधारणत: ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते. मे महिन्यात पहिल्या आठवड्यात ३९ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तापमानात चढउतार दिसून येत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेकजण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायांना लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.
उन्हाळा घरातच!
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी, तर मे महिन्यात कडक निर्बंध लागू आहेत. औषधं, दवाखाना, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कार आदी अत्यावश्यक कारणांशिवाय सकाळी ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा घरातच जात असल्याने ऊन लागण्याचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही. सकाळी ११ वाजल्यानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.
उष्माघातापासून बचाव म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाते. या वर्षी उष्माघाताचा रुग्ण आला नाही. कडक निर्बंध लागू असल्याने नागरिकदेखील घरातच आहेत. उन्हापासून बचाव म्हणून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे आढळून आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
वर्ष - मृत्यू
२०१९ - १
२०२० - १
२०२१ - ०