कोरोना उद्रेकाची पुन्हा भीती; अकोलेकरांची बेफिकिरी मात्र कायम! सक्रिय रुग्णांचा आकडा ३८ वर
By प्रवीण खेते | Published: April 6, 2023 03:59 PM2023-04-06T15:59:01+5:302023-04-06T15:59:24+5:30
नियंत्रणात असलेल्या कोरोनाचा पुन्हा फैलाव होत आहे.
अकोला - पूर्णत: नियंत्रणात असलेल्या कोरोनाचा पुन्हा फैलाव होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना उद्रेकाची पुन्हा भीती व्यक्ती केली जात आहे. दुसरीकडे, अकोलेकरांची बेफिकिरी मात्र कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाची भयावह स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.
मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कासवगतीने वाढू लागली होती. मात्र, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णसंख्यावाढीचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे ३८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत केवळ अकोला महापालिका क्षेत्र आणि मूर्तिजापूर तालुक्यातच कोरोना रुग्ण आढळून आले होते. मात्र, आता बाळापूर तालुक्यातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्येही कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतो का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे असले, तरी नागरिकांमध्ये बेफिकिरी दिसून येत आहे. रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून खाटांचे नियोजन आणि ऑक्सिजन व्यवस्था करण्याची तयारी केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
दाखल रुग्णांची संख्या वाढतेय!
जिल्ह्यातील सक्रिय काेरोना रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत ६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.