पडिक वार्ड बंद हाेण्याच्या धास्तीने पदाधिकाऱ्यांची आयुक्तांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:28+5:302021-04-10T04:18:28+5:30
मनपाच्या आस्थापनेवरील ७४१ सफाइ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९० पेक्षा अधिक कर्मचारी इतर विभागात दडून बसले आहेत. बहुतांश कर्मचारी संघटनेच्या नावाखाली ...
मनपाच्या आस्थापनेवरील ७४१ सफाइ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९० पेक्षा अधिक कर्मचारी इतर विभागात दडून बसले आहेत. बहुतांश कर्मचारी संघटनेच्या नावाखाली दबावतंत्राचा वापर करून कर्तव्यावरून पळ काढतात. यामुळे बाेटावर माेजता येणाऱ्या प्रामाणीक कर्मचाऱ्यांबद्दलही संशयाचे चित्र निर्माण झाले आहे. शहराची लाेकसंख्या व सफाइ कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येचे निकष लक्षात घेता पडिक वाॅर्ड बंद करून आस्थापनेवरील सफाइ कर्मचाऱ्यांनाच साफसफाइची जबाबदारी साेपविण्याचा निर्णय मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी घेतला आहे. दरम्यान, पडिक वाॅर्ड बंद हाेण्याच्या धास्तीने शुक्रवारी स्थायी समिती सभापती संजय बडाेणे, उपमहापाैर राजेंद्र गीरी, माजी सभापती बाळ टाले, सतीष ढगे,अजय शर्मा, सागर शेगाेकार यांनी आयुक्त अराेरा यांची भेट घेतली असता नियमबाह्य कामे बंद हाेतीलच असे यावेळी आयुक्तांनी ठणकावून सांगितले.
निविदा पुन्हा राबवणार नाहीच !मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर राेकडे यांच्या काळात पडिक वाॅर्डाची निविदा राबविण्यात आली हाेती. तेव्हापासून नव्याने निविदा काढलीच नाही. अचानक पडीक वार्ड बंद केल्यास साफसफाइची कामे विस्कळीत हाेतील,असे नमुद करीत नव्याने निविदा राबवा परंतु पडीक वार्ड बंद करू नका,अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली असता पुन्हा निविदा राबविणार नाहीच,असे आयुक्त निमा अराेरा यांनी ठणकावून सांगितले.
महिलांना कर्तव्य बजावावेच लागेल!
आस्थापनेवर पुरूष कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिला सफाई कर्मचाऱ्यांची माेठी संख्या आहे. त्या नाल्यांची स्वच्छता कशी करतील,असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला असता मी देखील महिला अधिकारी आहे. मी माझे कर्तव्य जसे बजावते तसेच महिला सफाइ कर्मचाऱ्यांना सुध्दा कर्तव्य बजावावेच लागेल. अन्यथा कारवाइ करावी लागेल,असे आयुक्तांनी स्पष्ट केले.