इयत्ता दहावीच्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या शुल्कात २0 पट वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:39 PM2018-12-02T14:39:26+5:302018-12-02T14:42:02+5:30
शिक्षण मंडळ पुणे यांनी २७ नोव्हेंबर रोजी नव्याने आदेश काढत तब्बल ४00 रुपये शुल्क वाढ करीत, हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: इयत्ता दहावी परीक्षा माध्यमिक स्तर पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षासाठीचे अर्ज आणि शुल्क विद्यार्थ्यांनी ६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान भरले असताना, शिक्षण मंडळ पुणे यांनी २७ नोव्हेंबर रोजी नव्याने आदेश काढत तब्बल ४00 रुपये शुल्क वाढ करीत, हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज आणि प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणे शुल्क भरल्यानंतर आता बोर्डाला जाग आली आणि बोर्डाने विद्यार्थ्यांकडून प्रतिविषय १00 रुपयेप्रमाणे ४00 रुपये वसूल करण्यास बजावले. बोर्ड वरातीमागून घोडे दामटवून विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप ‘विजुक्टा’ने केला आहे.
दहावीतील व्यावसायिक विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी व्ही १, व्ही २, व्ही ३ आणि व्ही ४ या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणे शुल्क घेतल्या जात होते. विद्यार्थ्यांनी अर्ज आणि प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणेच अर्ज भरले; परंतु शासन आदेशानुसार दहावीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रचलित असलेल्या ही १, व्ही २, व्ही ३ आणि व्ही ४ विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी कौशल्य चाचणी शुल्क प्रतिप्रशिक्षणार्थी ४00 रुपये शुल्क आकारण्यात यावे, असे राज्य मंडळास कळविले आहे. मार्च २0१९ पासून घेणाºया दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांकडून आता नव्याने शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज आणि शुल्क भरल्यानंतरही त्यांच्याकडून पुन्हा शुल्क वसूल करणे हे अन्यायकारक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ४00 रुपये शुल्क परवडणारे नसून, ही शुल्क वाढ शिक्षण मंडळाने मागे घ्यावी, अशी मागणी विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशनने शिक्षण मंडळाकडे केली आहे. शासनाने प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणे चार विषयांसाठी ८0 रुपयांवरून तब्बल २0 पट वाढ करीत, शुल्क ४00 रुपये करून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. एकीकडे कौशल्य व उद्योजकतेला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना, परीक्षा शुल्कात केलेल्या वाढीमुळे गरीब विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतील का, असा प्रश्नही ‘विजुक्टा’चे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
व्यावसायिक विषयांच्या परीक्षेचे अर्ज आणि शुल्क विद्यार्थ्यांनी भरले असताना, बोर्डाने ४00 रुपये शुल्क वाढ करून विद्यार्थ्यांकडून ते वसूल करण्यास सांगितले आहे. २0 पट शुल्क वाढ करून बोर्डाने गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. विद्यार्थी व पालकांची ४00 रुपये शुल्क भरण्याची क्षमता नाही.
डॉ. अविनाश बोर्डे, प्रांताध्यक्ष विजुक्टा.