नारीशक्ति सन्मान; श्रमिक पत्रकार संघातर्फे महिला पत्रकारांचा कार्यगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 05:10 PM2020-03-08T17:10:51+5:302020-03-08T17:11:22+5:30
सामाजिक बदलासाठी झटणाऱ्या नारीशक्तिचा मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव करण्यात आला.
अकाेला : घरातला पुरुष हा पुरुष म्हणून नव्हे; तर माणूस म्हणून वावरताे, तेव्हाच महिलांचे भविष्य उज्वल होते. समाजाला आज स्त्री किंवा पुरुष नको, तर माणूस हवा आहे. त्यामुळे माणुसकीची बिजे पेरत सर्वांनी सोबत चालायला हवे, असे मार्मिक आवाहन लेखिका-निवेदिता प्रा. सीमा रोठे यांनी रविवारी, ८ मार्चला केले. अकोला श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित नारीशक्ती सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. तोष्णीवाल लेआऊटमधील प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात हा अनाेखा सोहळा पार पडला.
माध्यमांमध्ये परिणामकारक आणि निर्भिडपणे काम करून सामाजिक बदलासाठी झटणाऱ्या नारीशक्तिचा मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर अर्चना जयंत मसने अािण जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार प्रामुख्याने उपस्थित हाेत्या. प्रा. रोठे पुढे म्हणाल्या, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्यारुपाने आज माध्यमांचा राजकीय नेत्यांवर वचक कायम अाहे. यात महिला पत्रकारांचेही मोठे योगदान असून, समाजामध्ये वावरताना महिला आणि पुरुषांनी सहभावनेने वावरण्याची गरज असल्याचे प्रा. रोठे यांनी सांगितले. पत्रकारिच्या माध्यमातून विविध प्रश्नांना प्रामाणिकपणे वाचा फोडण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे विशाल बोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अाभार प्रबोध देशपांडे यांनी मानले. पत्रकार संघाचे सदस्य सचिन देशपांडे आणि सुगत खाडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
नारीशक्तिचा गाैरव
नारीशक्ती सन्मान सोहळ्यात नेहा खत्री, निलम तिवारी, संगिता पातूरकर, डाॅ. निशाली पंचगाम, हर्षदा सोनोने, पूजा काळे, प्रियंका जाधव, किरण निलखन, रुपल शुक्ल, करुणा भांडारकर, जया भारती, अॅड. नीलिमा शिंगणे या महिला पत्रकारांचा यावेळी स्मृतीचिन्ह, ग्राम गिता, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रभात किड्स स्कूलच्या महिला कर्मचारी सिंधू गांधे अािण अर्चना चेटूले यांचाही महिला िदनी पत्रकार संघातर्फे गाैरव करण्यात अाला.
‘घरातच शिकविला जावा संस्कार’
महिलांचा सन्मान महिलांसह कुटुंबीतील सर्वच सदस्यांकडून घरातच शिकविला जाणे गरजेचे आहे. याशिवाय महिलांनीच परस्परांविषयी द्वेषभाव न ठेवता आपल्या सुरक्षेसाठी संघटित राहण्याची आज गरज आहे, असे मत िज.प.च्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांनी व्यक्त केले.
‘कमीपणा, भीती बाळगू नये’
विविध क्षेत्रात महिला आज प्रभावीपणे काम करीत आहेत. ही अभिमानास्पद बाब असून, महिलांनी कोणत्याही क्षेत्रात वावरताना कमीपणा किंवा भीती बाळगू नये तर आपल्या सुरक्षेसाठी एकत्र राहिले पाहिजे, असे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले.