फेरफारच्या नोंदी आता झटपट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:05 AM2019-12-24T11:05:17+5:302019-12-24T11:05:22+5:30
महसूल मंडळ अधिकारी स्तरावर फेरफारातील कोणताही फेरफार प्रमाणित करताना अनुक्रमे प्राप्त झालेली फेरफार नोंदीची प्रकरणे ‘फिफो’ या तत्त्वानेच निकाली काढण्यात येणार आहेत.
अकोला : ‘ई-फेरफार’ प्रणाली अंतर्गत मालमत्ताविषयक महसूल मंडळ अधिकाऱ्यांकडे फेरफार नोंदीसाठी प्राप्त होणारी प्रकरणे ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट ’(फिफो) या तत्त्वाने निकाली काढण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार फेरफारच्या नोंदी आता झटपट होणार आहेत.
ई-फेरफार प्रणाली अंतर्गत तलाठी स्तरावर फेरफारच्या नोंदी घेताना, ज्याप्रमाणे नोंदणीकृत दस्तांसंदर्भात अनुक्रम ‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ (फिफो) लागू करण्यात आला आहे. त्याप्रमाणे १८ नोव्हेंबरपासून महसूल मंडळ अधिकारी स्तरावर फेरफारातील कोणताही फेरफार प्रमाणित करताना अनुक्रमे प्राप्त झालेली फेरफार नोंदीची प्रकरणे ‘फिफो’ या तत्त्वानेच निकाली काढण्यात येणार आहेत.अशा सूचना जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार निवासी उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंडळ अधिकाºयांकडे अनुक्रमे फेरफार प्रमाणित करण्याची प्रकरणे प्राप्त झाली आहेत, त्याच क्रमाने फेरफार नोंदीची प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे फेरफारच्या नोंदीची प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार असून, फेरफारच्या नोंदी झटपट होणार आहेत. तसेच फेरफार नोंदीसाठी ‘फिफो’ लागू केल्याने मंडळ अधिकाºयांच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीमध्ये आणखी गुणवत्ता, पारदर्शकता व गतिमानता येणार आहे.