वैफल्यग्रस्त शेतक-यांनी केला फळबागांचा अंत्यविधी!
By admin | Published: June 1, 2016 01:16 AM2016-06-01T01:16:34+5:302016-06-01T01:16:34+5:30
वाशिम जिल्ह्यातील संतप्त शेतकर्यांनी जाळली झाडे: प्रशासनाविरुद्ध रोष
वाशिम: प्रशासकीय अधिकार्यांच्या व कर्मचार्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या दुबळवेल येथील शेतकर्यांनी ३१ मे रोजी संत्र्याची झाडे जाळून अंत्यविधी केला. याकरिता जिल्हय़ातील सर्व अधिकार्यांना पत्र देऊन बोलाविण्यात आले होते; मात्र एकही अधिकारी उपस्थित झाला नाही.
मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील शेतकर्यांना फळबाग व पीक विम्यासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकार्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३१ मे रोजी दुपारी शेतातील संत्र्याची सुकलेली झाडे तोडून ती जाळून टाकली. यावेळी सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे यांची उपस्थिती होती.
दुबळवेल येथील गट नंबर २१, २८, ५१ व ९४ मध्ये गत सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले; मात्र कृषी अधिकार्यांनी विमा काढला नाही. अवर्षण व सिंचन सुविधांचा अभाव असल्यामुळे फळबागा पूर्णत: सुकल्या. अखेर शेतकर्यांना कुठलाही आधार न मिळाल्याने त्यांनी सुकलेल्या फळबागांचा अंत्यविधी केला.