गुणवत्तेत ‘खते’ नापास!
By admin | Published: October 9, 2016 02:59 AM2016-10-09T02:59:40+5:302016-10-09T02:59:40+5:30
रासायनिक खतांची कृषी विभागाने केली तपासणी; एका कंपनीला ‘शो कॉज ’
अकोला, दि. 0८- पीक उत्पादनात भरघोस वाढीचा दावा करणार्या काही कंपन्यांची रासायनिक खते गुणवत्तेच्या निकषात नापास झाली आहेत. कृषी विभागाच्या नियमित तपासणीत ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी एका कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून दुसर्या कंपनीवर कारवाईची तयारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केली आहे.
पेरणी आणि त्यानंतरच्या हंगामात शेतकर्यांना विविध पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ करण्यासाठी आपल्याच कंपनीची रासायनिक खते कशी उपयुक्त आहेत, याचा पाढाच तयार असतो. शेतकरीही मोठय़ा आशेने ती खरेदी करतात. काही उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेतला जातो. गुणवत्तेत कमी असलेली उत्पादने त्यांच्या माथी मारल्या जातात. हा प्रकार रोखत शेतकर्यांची फसवणूक टाळण्यासाठी शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेवर जबाबदारी आहे. एका हंगामात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला बियाण्यांचे २४0, खतांचे १0६ तर कीडनाशकांचे ४४ नमुने प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्रातून गोळा करावे लागतात. त्यातील समाविष्ट घटकांचे प्रमाण, पोषण तत्त्वांची गुणवत्ता शासनाच्या प्रयोगशाळेत तपासली जाते.
जिल्हय़ातील मूर्तिजापूर आणि अकोला शहरातील कृषी सेवा केंद्रातून गोळा केलेल्या खतांच्या नमुन्यात घटकांचे प्रमाण अत्यल्प आढळून आले आहे. त्या उत्पादक कंपन्यावर कारवाईसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीच्या अहवालानुसार बियाणे निकृष्ट निघाल्यास थेट न्यायालयात प्रकरण दाखल केले जाते. तर खतांचे नमुने निकृष्ट असल्यास विभागीय कृषी सहसंचालकांकडे सुनावणीनंतर अंतिम कारवाई केली जाते.
*तीन केंद्रातील खतांचे घेतले नमुने
जिल्हा परिषदेच्या पथकांनी तीन कृषी सेवा केंद्रातून खतांचे नमुने गोळा केले. त्यामध्ये मूर्तिजापूर शहरातील विदर्भ कृषी सेवा केंद्रातील दोन खतांच्या नमुन्यात विविध घटकांचे प्रमाण कमी आढळले आहे. तर अकोला शहरातील कास्तकार कृषी सेवा केंद्रातील खताचा नमुनाही गुणवत्तेत नापास झाला आहे.
*दोन उत्पादक कंपन्यांवर कारवाईची तयारी
जिल्हय़ातील तीन कृषी सेवा केंद्रातील खतांचे नमुने गुणवत्तेत कमी पडल्याने त्या उत्पादक कंपन्यांवर कारवाईसाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये दोन खतांच्या नमुन्यासाठी नांदेड येथील मे. पारसेवार अँग्रो प्रा.लि, तर एका नमुन्यासाठी केनसो अँग्रो इंडस्ट्रिज, नाशिक या कंपनीवर कारवाई होणार आहे.