शेतकऱ्याने घरीच बनविले खत पेरणी यंंत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 10:12 AM2020-08-02T10:12:43+5:302020-08-02T10:12:55+5:30
खत पेरणी यंत्राचा हा जुगाड टेक्नॉलॉजीचा प्रयोग शेतीकरिता फायदेशीर ठरत आहे.
- विजय शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: खारपाणपट्ट्यातील एका शेतकºयाने पिकांच्या वाढीकरिता घरीच खत पेरणी यंत्र तयार केले आहे. सध्या या खत पेरणी यंत्राची उपयोगिता पाहून अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा हा यशस्वी प्रयोग करणे सुरू केले आहे. त्यामुळे खत पेरणी यंत्राचा हा जुगाड टेक्नॉलॉजीचा प्रयोग शेतीकरिता फायदेशीर ठरत आहे.
खारपाणपट्ट्यातील देवरी येथील हरिभाऊ वाघोडे यांच्याकडे २५ एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शेती व्यवसायाला वाहून घेतले आहे. खारपाणपट्ट्यात शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस न आल्यास हंगामातीत पीक हाताखालचे जाऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो. दुसरीकडे पिकांना खत देण्यासाठी मजुरीचा खर्च येतो; परंतु शेतामध्ये मजूर खत फेकतात. त्यामुळे खत पिकाच्या मुळाशी पोहोचत नाही. पर्यायाने बाष्पीभवन होते तर पाऊस झाल्यास खत वाहून जाते, अशा मन:स्थितीत लॉकडाऊनमध्ये एक दिवस हरिभाऊ वाघोडे हे घरी बसलेले असताना त्यांना घरात तेलाची निकामी कॅन दिसली. त्या कॅनवरून त्यांना खत पेरणी यंत्र करण्याची कल्पना सुचली. त्यांनी घरीच वखराला लावण्यासाठी १५ लीटर तेलाची निकामी कॅनची खतपेटी केली. त्याला दोन होल करून वखराला फिटिंग केली. वखराला पेरणी यंत्राचे दाते लावले. केवळ अडीच हजारांचे साहित्य व वेल्डिंग मजुरीचा त्यांना खर्च आला. वाघोडे यांनी खत पेरणी यंत्राचा प्रत्यक्ष शेतीवर प्रयोग केला असता तो यशस्वी ठरला. शेतात या खत पेरणीमुळे कपाशीच्या मुळाशी थेट ४-६ इंच खोल खत पोहोचते. वाघोडे यांनी शेतात कपाशी लागवड केली आहे. या पिकास १०० टक्के खत मिळत असल्याने कपाशीची वाढ होते आहे. या घरगुती बनावटीमुळे मजुरीची बचत झाली. कामाला गती आली. एकावेळी १० एकराला एक मजूर एक बैलजोडीद्वारे योग्य पद्धतीने खत देऊ शकतो.
पेरणी पट्ट्या पद्धतीने केली असल्याने खताची योग्य मात्रा मिळाल्याने १७ जून रोजी पेरणी केलेल्या कपाशीचे झाड, फांद्याची उंची ४ फूट झाली आहे. खारपाणपट्ट्यात शेतीमध्ये अभिनव प्रयोग त्यांनी केले आहेत. खारपाणपट्ट्यातील जमिनीचा पोत, पावसाचे प्रमाण नोंद घेत त्यांनी शेतीची पेरणी कशा पद्धतीने करावी, याबाबत केलेल्या प्रयोगाची डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ यांनीसुद्धा दखल घेतली आहे.