माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:46+5:302020-12-06T04:19:46+5:30
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत चांगला असतो. त्याकरिता पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट ...
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत चांगला असतो. त्याकरिता पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत निर्माण केले तर जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवता येते. सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. उपलब्धतेप्रमाणेच खतांचा वापर करणे आवश्यक आहे. पीक निघाल्यावर शेतातील मातीचे परीक्षण करून घेण्यासाठी जमिनीचा रंग, उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक भागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी जमा करा. पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल व्ही आकाराचा खड्डा करून त्यातील खडे विरहीत माती गोळा करावी, अशा पाच ते दहा ठिकाणची माती एकत्र करून त्याचे चार भाग करून विरुद्ध भागाची माती जमा करत शेवटी अर्धा किलो माती कापडी पिशवीत भरावी. त्यावर शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, जमिनीचा सर्व्हे क्रमांक इत्यादी माहितीची आत चिठ्ठी टाकावी व पिशवीवर लावावी. हा नमुना जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाच्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावा.