देशभरातील लोकनृत्यांची मेजवानी
By admin | Published: September 21, 2014 01:30 AM2014-09-21T01:30:36+5:302014-09-21T01:54:33+5:30
अकोला येथील युवा महोत्सवात गोंडी नृत्य, कोळी गीतांनी गाजवला तिसरा दिवस.
अकोला : युवा महोत्सवाचा तिसरा दिवस गाजविला गोंड संस्कृतीतील पारंपरिक गीतांवरील नृत्य तसेच कोळी गीतांनी. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सुरू असलेल्या युवा महोत्सवाच्या तिसर्या दिवशी शनिवारी विद्यार्थ्यांनी देशभरातील विविध लोकनृत्यांचे दर्शन घडविले. येथे उपस्थित श्रोत्यांना शनिवारी विविध संस्कृतीतील लोकनृत्यांची मेजवानी मिळाली.
रोन दोहे ना दादा रोन दोहे नारो
साटा वाडीते रोन दोहे नारो
हे आदिवासी गोंड संस्कृतीमधील गीतावर वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच कारंजा येथील के. एन. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. तसेच
या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ
आमच्या कोळी लोकांचा मान आहे तुझं देऊळ
समुंदराची देवी तू समुंदरातून आली
भक्त जनांचा उद्धार करायला देवी निघाली
हे गीत विद्याथ्यार्ंनी सादर करताच श्रोत्यांनी टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला. यासोबतच मालेगाव येथील रामराव झनक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले.
मी आहे कोळी सोरीला डोली, मुंबईच्या किनारी
मारतील कोली अनत्यान मोली, चल जावू बाजारी
अशाप्रकारे कोळी व गोंड संस्कृतीतील गीतांची बहर शनिवारी रसिक श्रोत्यांना बघायला मिळाली. लोकनृत्यामध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी देशातील विविध संस्कृतीतील लोकगीतांचे दर्शन घडविले.