ऐन सणासुदीच्या दिवसांत मूलभूत सुविधांची बोंबाबोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:21 PM2019-09-02T13:21:59+5:302019-09-02T13:22:11+5:30
ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे किळसवाणे चित्र समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात स्वच्छता राखण्याचा गवगवा केला जात असतानाच, ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे किळसवाणे चित्र समोर आले आहे. साफसफाईच्या मुद्यावर मनपाच्या स्वच्छता विभागाचा कारभार हवेत सुरू असून, ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या सत्ताधारी भाजपप्रती अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
सर्वांचा लाडका असणाºया गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मंडप उभारले असून, आकर्षक रोषणाई केली आहे. सणासुदीच्या निमित्ताने शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच दुसरीकडे सर्वत्र पसरलेली घाण व अस्वच्छतेमुळे विविध साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता बळावली आहे.
‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत २०१४ पासून केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला स्वच्छतेच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत आहे. यामध्ये घंटागाड्यांची खरेदी करण्यापासून ते दैनंदिन साफसफाईच्या कामासाठी तरतूद करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१४ पासून महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात असताना मागील पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील घाणीचे किळसवाणे चित्र दूर करण्यात सत्ताधारी सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप होऊ लागला आहे. प्रशासनाने मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाण, बाजारपेठ तसेच प्रभागांमधील अंतर्गत रस्ते, सर्व्हिस लाइन, नाल्या आदींची दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना स्वच्छता विभागाची मुजोरी अकोलेकरांच्या आरोग्यावर उठल्याचे दिसून येत आहे.
क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक सुस्तावले!
आरोग्य निरीक्षकांकडून दैनंदिन स्वच्छतेची माहिती घेऊन त्यांना सूचना, निर्देश देण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. तसेच प्रत्येक प्रभागात प्रत्यक्षात पाहणी करण्याचे काम आरोग्य निरीक्षकाचे आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात ठिकठिकाणी घाण, अस्वच्छता साचल्यामुळे क्षेत्रीय अधिकाºयांसह आरोग्य निरीक्षकांवर महापालिका आयुक्तांचा वचक नसल्याचे चित्र समोर आले आहे.
२९ कोटींच्या बदल्यात कोणती स्वच्छता?
संपूर्ण शहरात साफसफाईचा फज्जा उडाला असताना मनपाच्या आस्थापनेवरील ७४८ कर्मचाºयांचे वेतन आणि पडीत वॉर्डांतील साफसफाई करणाºया खासगी कंत्राटदारांच्या देयकापोटी प्रशासन वर्षाकाठी तब्बल २९ कोटी रुपयांची उधळपट्टी करीत असल्याची माहिती आहे. या २९ कोटींच्या बदल्यात शहरात नेमकी कोणती स्वच्छता राखली जाते, याचे मूल्यमापन आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह महापौर विजय अग्रवाल करतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.