सणासुदीच्या दिवसांत साफसफाईचा बाेजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:05 AM2020-11-11T11:05:37+5:302020-11-11T11:05:45+5:30
Akola Municipal Corporation News सर्विस लाइनमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून तुंबलेल्या नाल्यामुळे डासांची समस्या निर्माण झाली आहे.
अकाेला: ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरातील सर्विस लाइन व नाले-गटारांची साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. मनपा कमचाऱ्यांना दिवाळीच्या अनुषंगाने सहाव्या वेतन आयाेगातील फरकाची रक्कम अदा केल्यानंतरही करव्यापोटी प्रती आरोग्य निरीक्षक व सफई कमर्चारी उदासीन असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शहरात दीपावलीच्या अनुषंगाने बाजारपेठ सजली असून, अकाेलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशावेळी मनपा प्रशासनाने प्रभागांमध्ये स्वच्छता राखणे अपेक्षित असताना सर्विस लाइन तसेच नाल्यांमध्ये घाण असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी त्यांच्या उद्देशाला स्वच्छता विभागातील अधिकारी व आरोग्य निरीक्षक केराची टोपली दाखवत असल्याची परिस्थिती आहे. मनपाच्या आस्थापनेवरील ७४० सफाई कर्मचाऱ्यांची प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली असून २३ पडीत वाॅर्डमध्ये खासगी तत्त्वावर प्रत्येकी १४ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आरोग्य निरीक्षकांकडून प्रभागांमध्ये साफसफाईच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. यामुळे सर्विस लाइनमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून तुंबलेल्या नाल्यामुळे डासांची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रभागातील नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आरोग्य निरीक्षकांवर कारवाइ का नाही?
प्रभागांमधील दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. आजरोजी प्रभागांमध्ये निर्माण झालेली स्वच्छतेची समस्या लक्षात घेता आरोग्य निरीक्षकांना जबाबदारीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. मनपात उशिरा दाखल हाेणाऱ्या कमर्चाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात हाेत असताना कामचुकार आराेग्य निरीक्षक व सफाई कमर्चाऱ्यांवर कारवाई का नाही, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
वेतनासाठी आग्रही, कर्तव्याचा विसर
वेतनासाठी मनपा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करणाऱ्या कर्मचारी संघटना व त्यामध्ये सामील कर्मचाऱ्यांना कर्तव्याचा विसर पडल्याचे चित्र आहे. सणासुदीच्या दिवसांत संबंधित संघटनांनी या प्रकाराची जाण ठेवणे अपेक्षित असल्याचे बाेलल्या जात आहे.