अकोल्यात जमाव बंदीचा पहिल्या दिवशीच फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 06:10 PM2021-02-16T18:10:56+5:302021-02-16T18:29:05+5:30
Prohibation Order in Akola सार्वजिनक ठिकणी नागरिकांची गर्दी कायम असून, ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ आणि मास्कचा वापर होत नसल्याचे वास्तव समोर आले.
अकोला: जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून जमाव बंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला; मात्र पहिल्याच दिवशी (मंगळवारी) जमाव बंदी अंमलबजाणीचा अकोला शहरात फज्जा उडाला. शहरात सार्वजिनक ठिकणी होणारी नागरिकांची गर्दी कायम असून, ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ आणि मास्कचा वापर होत नसल्याचे वास्तव समोर आले.
फेब्रुवारी महिन्यात गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ झाली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत जमाव बंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतू जमाव बंदी आदेशाच्या अंमलबजावणीकडे पहिल्याच दिवशी (मंगळवारी) अकोला शहरात कानाडोळा करण्यात आला. शहरातील जनता भाजी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, टाॅवर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आदी भागात रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकणी नागरिकांची गर्दी कायम असून, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर नागरिकांकडून होत नसल्याचे वास्तव आढळून आले. तसेच जमाव बंदी आदेशाची अंमलबजावणी आणि करोना संसर्ग संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाइ करण्याच्या कामाकडेही संबंधित यंत्रणांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने, जमाव बंदीचा पहिल्या दिवशीच फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.