शालार्थ कुचकामी ठरल्याने शिक्षकांच्या आॅनलाइन वेतनाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:25 PM2018-12-16T16:25:42+5:302018-12-16T16:25:58+5:30
शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याचा प्रयोग सध्या तरी रखडला असून, शालार्थ प्रणालीच्या सॉफ्टवेअरचा बोजवारा उडाल्यामुळे शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या ८ ते १0 तारखेला होत आहे.
अकोला: शालेय शिक्षण विभागाचे कामकाज आॅनलाईन होत असताना, अकोला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन वेतन आॅफलाइन करण्यात येत आहे. शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याचा प्रयोग सध्या तरी रखडला असून, शालार्थ प्रणालीच्या सॉफ्टवेअरचा बोजवारा उडाल्यामुळे शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या ८ ते १0 तारखेला होत आहे.
शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना दरमहा १ तारखेला वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. आॅनलाइन वेतन देण्याची व्यवस्था करण्यासाठी शालार्थ सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले होते. सॉफ्टवेअर सुरळीत सुरू असताना, शिक्षण विभागाने हे सॉफ्टवेअर अपडेड करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून शालार्थचे सॉफ्टवेअरच सुरू झाले नाही. वर्ष उलटले तरी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिकी दुरुस्तीचे कामच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सॉफ्टवेअर नादुरुस्त असल्याने, शिक्षण विभागाची शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याची घोषणा हवेतच विरली आहे. त्यामुळे वर्षभरापासून शिक्षकांना दरमहा १ तारखेला वेतन मिळण्याऐवजी ८ ते १0 तारखेला वेतन मिळत आहे. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत शिक्षण विभागसुद्धा अनभिज्ञ आहे. शिक्षक संघटनांनी, शालार्थ प्रणालीची सॉफ्टवेअर दुरुस्त होवो किंवा न होवो, शिक्षकांचे वेतन मात्र शिक्षण विभागाने वेळेत आणि नियमित द्यावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
पोषण आहाराचे अनुदानही झाले आॅफलाइन!
शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून शालेय पोषण आहाराचे अनुदान यापूर्वी शिक्षकांच्या खात्यात आॅनलाइन पद्धतीने जमा करण्यात यायचे; मात्र आता हे आॅनलाइन अनुदान बंद करून आॅफलाइन देण्यात येत आहे. त्यात चार महिन्यांपासून शाळांचे पोषण आहाराचे अनुदान रखडले आहे.
वर्षभरापासून शालार्थ प्रणालीचा बोजवारा उडाला आहे. दर महिन्याला शिक्षकांचे वेतन उशिरा होते. कोणत्या महिन्यात १५ तारखेला वेतन होते. शिक्षक परिषदेने अनेकदा निवेदने दिले तरी शालार्थ सॉफ्टवेअरचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.
- श्याम कुलट, कार्याध्यक्ष
राज्य शिक्षक परिषद