‘स्वीकृत’साठी इच्छुकांची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:00 AM2017-11-22T02:00:26+5:302017-11-22T02:01:31+5:30
महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांकडे इच्छुकांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपाच्या गोटात तीन जणांच्या नावावर चर्चा केली जात असली, तरी ऐनवेळेवर फेरबदल होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांकडे इच्छुकांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपाच्या गोटात तीन जणांच्या नावावर चर्चा केली जात असली, तरी ऐनवेळेवर फेरबदल होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसने ५२ पेक्षा अधिक इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्ष न्यायालयीन फेर्यात अडकल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड होणार असल्याचे चित्र आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात आटोपल्यानंतर ९ मार्च रोजी महापौर, उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा पार पडला. अकोलेकरांनी मनपाच्या वतरुळात पहिल्यांदाच राजकीय पक्ष म्हणून भाजपाला स्पष्ट बहुमत देत महापालिकेची सत्ता सोपवली. सत्ताधारी भाजपाचा उत्साह पाहता महिनाभरात स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रि या पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर का होईना, २३ नोव्हेंबर रोजी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे ४९ नगरसेवक असून, संख्याबळानुसार पक्षाकडून तीन सदस्यांची निवड केली जाईल. काँग्रेसचे १३ नगरसेवक असून, निकषानुसार एका सदस्याची निवड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित लोकशाही आघाडी व शिवसेनेच्या आघाडीचे संख्याबळ समसमान नऊ आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे राकाँ व सेनेचा एक सदस्य वगळता उर्वरित चार सदस्यांची निवड करण्याचा आदेश नागपूर हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे सभागृहात चार सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडेल.
गोखलेंची वाट बिकट?
मनपा निवडणुकीत पक्षाने दोन वेळा तिकीट नाकारलेल्या भाजयुमोचे पदाधिकारी गिरीश गोखले यांची संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर मजबूत बांधणी असल्याचे बोलल्या जाते. निदान स्वीकृतच्या माध्यमातून मनपाच्या सभागृहात प्रवेश करण्यासाठी गोखले यांनी नागपूर हायकोर्टापर्यंत धाव घेतली. स्वीकृतसाठी गोखले यांचे नाव निश्चित मानल्या जात असले, तरी पक्षांतर्गत वातावरण पाहता गोखले यांची वाट बिकट असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे.
निवडणूक लढणार्यांना संधी नाही!
मनपात कधीकाळी सर्वात मोठा पक्ष असणार्या काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्षाने ५२ पेक्षा अधिक इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याची माहिती आहे. यातही ज्या उमेदवारांना मनपा निवडणुकीत उमेदवारी मिळाली होती, त्यांना स्वीकृतसाठी पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे बोलल्या जात आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या माध्यमातून काँग्रेस मराठा कार्ड खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.