हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 05:08 PM2021-07-20T17:08:42+5:302021-07-20T17:08:48+5:30
A fierce fire at a hardware store in akola : महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंब पाण्याद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या माळीपुरा परिसरातील महेश हार्डवेअर या दुकानाला मंगळवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंब पाण्याद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.
माळीपुरा परिसरात असलेल्या यकीन हॉस्पिटलच्या समोर महेश हार्डवेअर नावाचे मोठे दुकान आहे. या दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे महेश हार्डवेअर संचालकांचे सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दोन बंब पाण्याद्वारे ही आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. पोलीस व महसूल प्रशासनाने पंचनामा केला असून नुकसान किती झाले याची आकडेवारी घेण्यात येत आहे.
समोरील हॉस्पिटलला झळ नाही
महेश हार्डवेअर या दुकानासमोरच यकीन हॉस्पिटल आहे. या आगीमुळे हॉस्पिटलला झळ पोहोचण्याची चर्चा होती; मात्र तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे हॉस्पिटलच्या कोणालाही झळ पोहचली नाही.