पंधरा दिवसांपासून शिवनेरी वसतिगृहातील विद्यार्थी अंधारात
By Admin | Published: August 21, 2015 01:13 AM2015-08-21T01:13:29+5:302015-08-21T01:13:29+5:30
पीकेव्ही येथील प्रकार; विद्यार्थी करताहेत अंधारात अभ्यास.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील विद्यार्थी मागील पंधरा दिवसांपासून अंधारात राहत आहेत. याबाबत अधिकार्यांना सांगितले असता विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यानच्या काळात परीक्षा पार पडली असून, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या उजेडातच अभ्यास करावा लागला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच शहरात मुसळधार पाऊस झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहात मंगळवार ४ ऑगस्ट रोजी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होणार या प्रतीक्षेत विद्यार्थी होते; परंतु दोन ते तीन दिवस उलटून गेल्यावरही वसतिगृहातील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे मुख्य वसतिगृह प्रमुख डॉ. आहेरकर यांच्याकडे वारंवार तक्रार केली; परंतु त्यांनी याबाबत विद्यापीठ अभियंत्यांना कळविण्यात यावे, असे सांगितले. विद्यार्थी विद्यापीठाच्या अभियंत्यांकडे गेले असता, तुम्ही महावितरण कार्यालयात तक्रार नोंदवा, असा उपदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. विद्यापीठाच्या अभियंत्यानी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी महावितरण कार्यालयात तक्रार नोंदविण्यासाठी गेले. या ठिकाणी त्यांनी विद्यापीठाचा दोष असल्याचे म्हटले. तसेच येथील विद्युत रोहित्राची समस्या असून, याबाबत महाविद्यालयामार्फत तक्रार नोंदविण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांची परीक्षा झाली; परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या नादात विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून अधिकार्यांची कार्यालये फिरावे लागले. रात्रीच्या वेळी मिळालेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी कसाबसा अभ्यास करून परीक्षा दिली. पंधरा दिवसांचा कालावधी ओलांडला असला तरी, अद्यापही वसतिगृहातील वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला नाही. परिणामी विद्यार्थी अंधारातच रात्र काढत असून, विद्यार्थ्यांच्या जीवितासदेखील धोका आहे.