पाचवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन शनिवारपासून अकोल्यात
By Atul.jaiswal | Published: November 18, 2017 05:38 PM2017-11-18T17:38:38+5:302017-11-18T17:40:56+5:30
अकोला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे.
अकोला : विश्वात्मक विचारांची, राष्ट्रीयत्वाची पेरणी करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समृद्ध विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने गत चार वर्षांपूर्वी सुरु झालेले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी सप्तखंजेरीवादक ज्येष्ठ गुरुदेव प्र्नचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा अंधारे असणार आहेत, अशी माहिती वंदनिय राष्ट्रसंती श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता ग्रामगीता प्रचारक गोवर्धन खवले यांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान चिंतनाने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता डॉ. पंदेकृविचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनासला प्रमुख अतिथी म्हणून आचार्य हरीभाऊ वेरुळकर, ज्येष्ठ किर्तनकार आमले महाराज, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, गुरुकुंज प्रचारप्रमुख दामोदर पाटील, आजीवन प्रचारक भास्करराव विघे, भाजप महासचिव रामदास आंबटकर, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, काँग्रेस शहराध्यक्ष बबनराव चौधरी, डॉ. गजानन नारे, ज्ञानेश्वर रक्षक, मुगुटराव बेले, संतोष हुशे आदी उपस्थित राहणार आहेत.
यानंतर दुपारी २ वाजता ‘आम्ही घडू देशासाठी’ हा परिसंवाद अमरावी विद्यापीठ रासेयो संचालक प्रा. डॉ. राजेश मिरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी ४ वा. स्व. अंबरिश कविश्वर स्मृती निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्षिस वितरण समारंभ, सायंकाळी ५.३० वाजता ‘आजच्या युवकांची दशा व दिशा’ या विषयावर व्याख्यान, तर रात्री ८ वाजता अॅड. अनंत खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.
रविवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर ११.३० वाजताा अॅड. विनोद साकरकार यांच्या अध्यक्षतेखाली शेतीविषयक धोरण विषयावर परिसंवाद, त्यानंतर दुपारी १.३० वा. ‘राष्ट्रसंतांना अपेक्षीत महिलोन्नती’ हा परिसंवाद, दुपारी २.३० वा. ‘ग्रामगीता जीवन विकास परिक्षा काळाची गरज’हा परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ४.३० वा. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या विशेष उपस्थितीत समारोपीय सत्राला प्रारंभ होईल. रात्री. ८ वा. संदीपपाल महाराज यांच्या राष्ट्रीय प्रबोधनाने संमेलनाची सांगता होईल. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.