कोरोनाशी लढा : डॉक्टरांच्या सुरक्षेचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:01 AM2020-03-24T11:01:45+5:302020-03-24T11:04:28+5:30
‘पर्सनल प्रोटेक्शन कीट’ आणि ‘एन-९५’ मास्क उपलब्ध करून देण्यात आले नाही.
कमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना समुपदेशन वॉर्डात दररोज शेकडो प्रवासी नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे; मात्र या ठिकाणी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अद्यापही ‘पर्सनल प्रोटेक्शन कीट’ आणि ‘एन-९५’ मास्क उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे कोरोनाशी लढा देणाºया डॉक्टरांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विदेशातून येणाºया नागरिकांसह पुणे-मुंबईसह देशातील इतर मोठ्या शहरातून दररोज शेकडो प्रवासी अकोल्यात येत आहेत. शहरात येताच या नागरिकांची सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या ठिकाणी ज्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे, त्यांना प्रशासनातर्फे आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आले नाहीत. सध्या तरी ‘एचआयव्ही’ कीटवर गरज भागविली जात असली, तरी ही पुरेशी नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इतर शहरांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसला, तरी संशयितांचा आकडा दहापेक्षा जास्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्यांमध्ये एकाला जरी कोरोनाची लागण असेल, तर ते डॉक्टरांसह इतरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.
डॉक्टरांचे आरोग्य जपणे अत्यावश्यक!
लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या मर्यादित आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचे आरोग्य प्रभावित झाल्यास कोरोनाविरुद्ध सुरू असलेला लढाही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जपत असताना डॉक्टरांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
तीन हजार ‘पी-पी’ कीटची मागणी
सध्या तरी सर्वोपचार रुग्णालयाकडे केवळ दोनच ‘पर्सनल प्रोटेक्शन कीट’ कीट आणि मोजके ‘एन-९५’ मास्क उपलब्ध आहेत. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी ३ हजार ‘पी-पी’ कीटची आॅर्डर दिल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे; परंतु या कीट अद्यापही मिळाल्या नसल्याची माहिती आहे.
नागरिकांची हलगर्जी ठरू शकते घातक
प्रवासातून येणारे शेकडो नागरिक कोरोना समुपदेशन कक्षात वैद्यकीय चाचणी करून घेत आहेत; मात्र यातील अनेक जण हलगर्जी करत असल्याचे निदर्शनास येते. त्यांची ही हलगर्जी डॉक्टरांसह इतरांसाठीही घातक ठरू शकते.