कोरोनासोबतच ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याने दिला टायफाइड अन् काविळविरुद्ध लढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:41 PM2020-05-26T15:41:52+5:302020-05-26T15:42:00+5:30
एका कोविड योद्ध्याशी सोमवारी ‘लोकमत’ने संवाद साधला.
अकोला : कोरोना योद्धा म्हणून लोकांना कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचे आवाहन करताना स्वत:च पॉझिटिव्ह निघालो. दुर्दैवी बाब म्हणजे याच वेळी टायफाइड आणि काविळ या दोन्ही आजारांनी मला ग्रासले होते. त्यामुळे आपली रोगप्रतीकारकशक्ती साथ देईल की नाही, ही भीती होती; पण डॉक्टरांचे प्रयत्न आणि सहकार्यांच्या प्रार्थनेमुळे मृत्युुच्या दाढेतून परतलो, हे सांगत असताना अकोलेकरांनो अजूनही वेळ गेली नाही, प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन कोरोनाबाधित एका पोलीस कर्मचाºयाने ‘लोकमत’शी बोलताना केले.
अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरुन पोलीस कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र हे करत असताना पोलीस कर्मचाºयानांच कोरोनाची लागण होत आहे. अशाच एका कोविड योद्ध्याशी सोमवारी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाविरुद्ध दिलेल्या लढाईसंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रामदासपेठ पोलीस ठाण्यातील ५६ वर्षीय कर्मचारी हे ड्युटीवर असताना त्यांना अचानक ताप आला. डॉक्टरांकडे गेल्यावर समजले की, टायफाइड आणि काविळ या दोन्ही आजारांनी मला ग्रासले होते. त्यामुळे थकवा आला होता; मात्र अशातच कोरोनाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. टायफाइड आणि काविळसोबतच आता कोरोनाचीही लागण झाल्याने मनातील भीती वाढू लागली होती. रोगप्रतीकारकशक्ति कमी झाल्यामुळे चिंता वाढली होती; पण कुटुंबीयांनी धीर दिला. पोलीस सहकाऱ्यांनीदेखील आत्मबळ वाढविले. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचे बळ मिळाले. शिवाय, सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी उत्तम काळजी घेतल्याने कोरोनातून लवकर बरा झालो; पण ही लढाई एवढी सोपी नव्हती. कोरोना हा आजार मानसिक खच्चीकरण करणारा आजार आहे. हा आजार कोणालाही होऊ नये, असे कोरोनातून पूर्णत: बरे झालेल्या पोलीस कर्मचाºयाने ‘लोकमत’ ला सांगितले.
-कोरोना योद्धा म्हणून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. अनेकांनी ऐकले, तर काहींनी दुर्लक्ष केले. अकोलेकरांनो, परिस्थिती भयावह होत चालली आहे. आतातरी कोरोनाला हलक्यात घेऊ नका. नियमांचे पालन करा.
- पोलीस कर्मचारी, रामदासपेठ पोलीस ठाणे, अकोला.