कोरोनाविरुद्ध लढाई : संवेदनशील भागात ‘डोअर-टू-डोअर’ सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 05:14 PM2020-04-21T17:14:19+5:302020-04-21T17:15:00+5:30
मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुढे आले आहे.
अकोला : अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या भागात हे रुग्ण गवसले, तो संपूर्ण भाग सील करण्यात आला. आता या भागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली का, हे शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. या कामात मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुढे आले आहे.
अकोल्यातील बैदपुरा, अकोट फैलसह पातूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. दररोज या भागातील प्रत्येक कुटुंबांच्या घरी आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस भेट देत आहे. नागरिकांच्या आरोग्याची ते विचारपूस करीत आहे. यात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण यंत्रणा नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आहे का, याचे सर्वेक्षण करीत आहे.
हे सर्व सर्वेक्षक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात. यापैकी काही आशांना वाईट अनुभव आले; मात्र नागरिकांना तुमच्याच भल्यासाठी हे सर्वेक्षण असल्याचे सांगितल्यानंतर प्रतिसाद मिळतो. तथापि, अनेकदा अपशब्द, अपमान सहन करावा लागतो, असे त्यांनी सांगितले; मात्र राष्टÑीय कार्य पूर्ण करायचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कामात झोकून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकोल्यातील काही भागात आशा स्वयंसेविकांना शिवीगाळही झाली; पण त्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे राहिल्याने त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे.
भीती आहे; पण कोणी तरी पुढाकार घेतलाच पाहिजे ना?
कोरोना आपल्या मागे तर येणार नाही ना, अशी भीती अनेक आशा स्वयंसेविकांना वाटते; मात्र दुसऱ्याच क्षणी अशी चिंता दूर सारत त्या प्रामाणिकपणे काम करतात. घाबरून कसे चालेल? आपली वैयक्तिक काळजी घेऊन हे काम कोणाला तरी करावे लागणारच ना, अशा भावना त्यांच्या आहेत.
आमचीही तपासणी करा
आशा व इतर कर्मचारी सर्वेक्षणात व्यस्त आहेत. त्यांना खबरदारी घेऊनही अनपेक्षितपणे संसर्ग झालाच, तर त्वरित माहिती मिळणे शक्य नाही. यामुळे सर्वेक्षणाचे काम आटोपल्यानंतर आमचीही आरोग्य तपासणी करावी, असे मत काही आरोग्य सेविकांनी व्यक्त केले.